'करोनावर लस डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात'

 


माय अहमदनगर वेब टीम

नागपूर: 'करोना विषाणूवरील लस डिसेंबर महिन्याच्या अखेर अथवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेस तसेच जोखमीच्या रुग्णांना प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात येईल. प्रत्येक कोविड योद्ध्याला लस दिली जाईल. यासाठी आरोग्य विभागाने सर्व स्तरावर सूक्ष्म नियोजन करावे', असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे करोना विषाणू  लसीकरणाबाबत करावयाच्या नियोजनासंदर्भात जिल्हा टास्क फोर्सची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी रविंद्र ठाकरे बोलत होते. करोना विषाणूवरील लसीकरण मोहीम ही शहर ते ग्रामीण पातळीपर्यंत राबवायची आहे, असे नमूद करताना ठाकरे म्हणाले, 'लसीकरणाचा लाभ वैद्यकीय क्षेत्राला सर्वप्रथम दिला जाईल. यासाठी महानगरपालिका क्षेत्र तसेच पंचायत समिती अंतर्गत रुग्णालयांनी त्यांच्या येथील डॉक्टर्स तसेच नर्सेस यांची लसीकरणासाठी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी केलेल्यांची संपूर्ण माहिती ही केवळ लसीकरणाच्या नियोजनासाठीच वापरण्यात येणार आहे. ॲलोपॅथीप्रमाणेच आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी उपचार करणाऱ्या डॉक्टर्स तसेच नर्सेसचा यात समावेश करण्यात येणार आहे. करोनावरील लसीकरण म्हणजे पूर्णत: सुरक्षा नसून नंतरच्या कालावधीतही काळजी घेणे आवश्यक आहे.' महानगरपालिका क्षेत्राच्या रुग्णालयातील लसीकरणासंदर्भात स्टाफ नर्सेसची नाव नोंदणी सुरु आहे. नाव नोंदणीनुसारच लसीकरण करण्यात येईल. यासाठी ज्यांनी अद्यापही नाव नोंदणी केली नाही त्यांनी तातडीने नाव नोंदणी करावी, असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.

वाचा: आता फक्त केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा; करोना लसीबाबत टोपेंचे मोठे विधान

लसीकरणासाठी जिल्ह्यामध्ये एकूण ५९७ लस टोचणाऱ्यांची (नर्सिंग स्टाफ) संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये महानगरपालिकेकडील २०९ तर ग्रामीण भागातील आरोग्य विभागातील ३८८ नर्सेसचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ६६१ ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येईल. त्यामध्ये महानगरपालिका हद्दीत ९०२ तर ग्रामीण भागात १ हजार ७५९ लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येतील. लस टोचणाऱ्या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. तसेच लसीकरण केलेल्या व्यक्तीला अर्धा तास लसीकरण केंद्रावर थांबविण्यात येईल. लसींच्या साठ्यांसाठी सर्व केंद्रांवर शीत कपाटे उपलब्ध राहतील, अशी माहिती यावेळी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचे अश्विनी नागर यांनी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उप जिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. महम्मद साजीद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक थेटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. अर्चना कोठारी आदी यावेळी उपस्थित होते.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post