![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjEtn76zXb9wlppSjqBMOlqa-t968emyWvyEG6eRW6FoH6zhyphenhyphenb9SvB_bIMgoG5jkPUEW01ljHL_tN2nyzMw1HdEqXXtpbUyzG7N2Q9xGwVn69UGKt84537VsZlmy5wj4BWyzzRJNjYp_FEi/s320/Screenshot_2020_1211_214941.jpg)
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात माध्यमे आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणाऱ्यांनी जबाबदारीने वागावे. मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कोर्टाला हस्तक्षेप करून आदेश द्यावा लागेल, अशी तंबी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी आज, शुक्रवारी दिली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होती. पोलिसांकडून कागदपत्रे उशिरा आल्याने म्हणणे सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. सोबत पोलिसांनी बोठे याला स्वत: हजर करण्यात यावे, अशा विनंतीचा अर्जही केला आहे. हे कामकाज सुरू असताना न्यायाधीशांचे लक्ष कोर्टातील गर्दीकडे गेले. त्या अनुषंगाने न्यायाधीशांनी तंबी दिली. प्रसार माध्यमे, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्यक्त होताना जपून लिहावे. मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न होता कामा नये, जर असे प्रकार घडले तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. त्यांची दखल घेऊन योग्य ते आदेश दिले जातील, असेही कोर्टाने बजावले.
आरोपीचे वकील अॅड. महेश तवले यांनी काही कथित समाजसेवक या प्रकरणाबद्दल आणि कोर्टाबद्लही सोशल मीडियात वेगवेगळ्या पोस्ट करीत असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर कोर्टाने कुठे काही आक्षेपार्ह आढळून आले तर, त्याच्या प्रिंट काढून कोर्टात सादर करा, अशा सूचना तवले यांना दिल्या.
Post a Comment