ठाकरे सरकार पहिल्या परीक्षेत पास होणार का?; गुरुवारी लागणार निकाल माय अहमदनगर वेब टीम

कोल्हापूर - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज शांततेच मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे ६९.०८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. या सहाही ठिकाणची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असून या सहा जागांचा निकाल काय असणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

औरंगाबाद पदवीधरसाठी ६१.०८ टक्के, पुणे पदवीधरसाठी ५०.३० टक्के, नागपूर पदवीधरसाठी ५४.७६ टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ ८२.९१ टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघात ७०.४४ टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे ९९.३१ टक्के मतदान झाले, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. या सहाही मतदारसंघांत मुख्य लढत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी असून दोन्हीकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आल्याने आता लक्ष निकालाकडे लागले आहे. निकालानंतर दोन्ही बाजूकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे.

पुणे विभागात सर्वाधिक चुरस

कोल्हापूर: अनेक मंत्री, दोन प्रदेशाध्यक्षांनी प्रतिष्ठेची करत प्रचारात रंग भरल्याने अंत्यत चुरस निर्माण झालेल्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी कोल्हापूर जिल्ह्यात भरभरून मतदान झाले. ‘पदवीधर’ साठी ६९ टक्के तर ‘शिक्षक’साठी ८६.७७ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारी वाढल्याने निकालाची उत्सुकता वाढली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावत प्रचार केला. त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही पायाला भिंगरी लावत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यामुळे या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली होती. या चुरशीमुळे मतदान मोठ्या प्रमाणात होण्याची अपेक्षा होती.त्यानुसार मतदान झाले. सकाळपासूनच जिल्ह्यातील २८६ मतदान केंद्रावर गर्दी दिसत होती. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेऊन मतदान करून घेण्यात येत होते. दुपारपर्यंत शिक्षकसाठी ८० तर पदवीधर साठी ४८ टक्के मतदान झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करत मतदान करून घेतले. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाले. ग्रामविकासमंत्री मुश्रीफ, पालकमंत्री पाटील, भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर व कागल येथे मतदान केले. गेले पंधरा दिवस या नेत्यांनी एकमेकांना आव्हान दिल्याने आणि जोरदार प्रचार केल्यानेच मतदानाची टक्केवारी वाढली आहे. पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे अरूण लाड तर भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात तर शिक्षक मतदार संघात जयंत आसगावकर व जितेंद्र पवार यांच्यातच चुरस दिसली.

आठ करोनाबाधितांनी केले मतदान

औरंगाबाद: औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी विभागातील आठही जिल्ह्यांत सरासरी ६१.०८ टक्के मतदान झाले. पैठण तालुक्यातील दांडगा राजंणगाव येथील अख्ख्या गावात फक्त दोनच पदवीधर मतदार असल्याने त्यांनी बाला नगर मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे दोन मतदार एकाच घरातील असून ते पती-पत्नी आहेत. औरंगाबाद महापालिकेच्या विविध कोविड केअर सेंटर्समध्ये उपचार घेत असलेल्या आठ रुग्णांनी मंगळवारी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदाराचा हक्क बजावला. या सर्वांना रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रांवर नेण्यात आले. दरम्यान, मतदानासाठी देण्यात आलेल्या मतपत्रिकेवर आक्षेप घेत उमेदवार संजय तायडे यांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post