धक्कादायक : महिला पोलिसाच्या खुनाचा प्रयत्न



माय अहमदनगर वेब टीम

पारनेर : सर्व्हर डाऊन असल्याने ऑनलाइन फिर्याद दाखल करण्यास उशीर होत होता. मात्र, त्याचा राग आल्याने, फिर्याद घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत फिर्यादीसह सोबत आलेल्या पाच जणांनी सुपे पोलिस ठाण्यातच महिला पोलिस कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. 

भीमाबाई रेपाळे असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत रेपाळे यांच्या फिर्यादीवरून सुपे पोलिस ठाण्यात आज पहाटे पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

बन्सी कांबळे, त्यांची मुलगी शिवानी व तेजश्री कांबळे (रा. सुपे), मंदा संपत गांगुर्डे (रा. चेंबूर, मुंबई) व अशोक पिराजी जाधव (रा. सुपे) अशी आरोपींची नावे आहेत. 

सुपे पोलिस ठाण्यात रविवारी रेपाळे यांना रात्रपाळीची ड्युटी होती. रात्री साडेअकरा वाजता फिर्याद देण्यासाठी वरील आरोपी सुपे पोलिस ठाण्यात आले. त्यांची फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू असताना, अचानक सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे फिर्याद नोंदविण्यास विलंब होत होता. मात्र, पोलिस जाणूनबुजून फिर्याद नोंदविण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वरील आरोपींनी केला.

रेपाळे यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, शिवीगाळ करीत तुझ्याविरुद्ध "ऍट्रॅसिटी'चा गुन्हा दाखल करून तुझी नोकरी घालवितो, अशी दमबाजी आरोपींनी केली. शिवानी कांबळे हिने रेपाळे यांना गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तेजश्री व मंदा यांनीही त्यांना मारहाण केल्याचे रेपाळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार, आज पहाटे गुन्हा दाखल झाला. 

 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post