त्यांची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही तिघे एकत्र!माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- 'राज्यातील सत्तेमध्ये समान किमान कार्यक्रमावर आम्ही एकत्र आलो आहोत. कुठेही आमच्यात मतभेद नाही आणि ते असण्याचे कारणही नाही. जोपर्यंत भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही एकत्र आहोत,' असे वक्तव्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ते नगरमध्ये बोलत होते. 'यूपीएचे नेतृत्व करण्यास सोनिया गांधी सक्षम आहेत,' असेही त्यांनी सांगितले.ओबीसी जिल्हा मेळाव्यासाठी मंत्री विजय वडेट्टीवार नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आज शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखात शरद पवार यांच्या नेतृत्वाबाबत केलेल्या भाष्याबाबत वडेट्टीवार यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, 'देशात जो पक्ष मोठा असतो, तो नेतृत्व करीत असतो. विरोधकांमध्येही ज्यांचा पक्ष मोठा तो नेतृत्व करतो. देशात सध्या भाजप पक्ष मोठा आहे. त्यामुळे उद्या त्यांचे घटक पक्ष म्हणतील खालच्या लोकांनी नेतृत्व करावे, पण तसं होत नसतं. राहिला आमच्या नेतृत्वाचा विषय, तर सोनिया गांधी नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. आम्ही अनेक राज्यात निवडणूक जिंकलो. पण भाजपच्या कुटील, फोडाफोडीच्या राजकारणामुळे आमच्या हातातून अनेक राज्य गेली आहेत. देशाच्या राजकारणात असे कधी झाले नाही, की माणसे फोडून सरकार बनवले गेले. मात्र भाजपने पैशाच्या जोरावर, सत्तेच्या मस्तीत, फोडाफोडी करून गोव्यात, पूर्वोत्तर राज्यात, कर्नाटक, अशा विविध ठिकाणी सरकार बनवले आहे. जे फोडाफोडीचे प्रकार घडत आहेत, ती लोकशाहीसाठी चांगली बाब नाही. लोकशाही पायदळी तुडवून गुलाम बनवण्याचे, हुकूमशाहीकडे नेण्याची ही प्रवृत्ती आहे,' असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी भाजपवर केला.

'महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्वात उत्तम काम सुरू आहे. काँग्रेस पक्षाने नागपूरची जागा ५८ वर्षानंतर जिंकली. पुण्यातील जागा जिंकली. काँग्रेसचा इतिहास बदलवणाऱ्या या गोष्टी घडल्या आहेत. आता जो तो पक्ष आपापल्या पद्धतीने काम करीत असून प्रत्येकाला आपला वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. राज्याच्या सत्तेमध्ये आम्ही समान कार्यक्रमावर एकत्र आहोत. कुठेही आमच्यात मतभेद नाही, आणि ते असण्याचे कोणतेही कारण नाही. जोपर्यंत भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही

महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत,' असेही ते म्हणाले.... तर ईडीला लोक बीडी सारखे फुकतील!'आता राजकारणात बदला घेण्याची भावना वाढली आहे. पूर्वी मतभेद होते, पण मनभेद नव्हते. आता मात्र राजकारणात मनभेद वाढले आहेत . ही प्रवृत्ती वाढत असून हे लोकशाहीला पोषक नाही. सत्ता कोणाच्या बापाच्या मालकीची नसते. हे भाजपने लक्षात ठेवावे. त्यामुळे भाजप जे पेरत आहे, ते आगामी काळात उगवणार, हे ही लक्षात घ्यावे. केंद्रीय एजन्सीचा दुरुपयोग कोणाच्या मागे लावण्यासाठी केला जात असेल तर हे योग्य नाही. ही प्रथा भविष्यात सर्वांना अडचणीची आहे. उद्या महाराष्ट्रातील लोक चिडले तर ईडीला बीडी सारखे फुकतील,' असा टोलाही त्यांनी एकनाथ खडसे प्रकरणावरून भाजपला लगावला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post