'त्या' नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : करमाळा तालुक्यात तो नरभक्षक बिबट्या मारल्याने पाथर्डी, जामखेड, आष्टी आदी तालुक्यातील शेतकऱ्यांचा श्वास मोकळा झाला आहे. पाथर्डीत तिघांचा बळी घेतल्यानंतर बनविभागाने काही बिबटे पिंजऱ्यात टाकले, मात्र तरीही बळी जातच होते. त्यामुळे तो नरभक्षक बिबट्या बाहेरच असल्याचे निष्पन्न होत होते. तोच बिबट्या आष्टी, करमाळा तालुक्याकडे गेल्याचे बोलले जात होते. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात बिबट्याला आज शार्प शूटरने गोळ्या घालून ठार केले. वन विभागाच्या मदतीने ही कार्यवाही झाली. वांगी येथील रांखुडे वस्तीवरील पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत या बिबट्याला ठार करण्यात यश आले. नगर जिल्ह्यासह जालना, औरंगाबाद, बीड व सोलापूर जिल्ह्यात या नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता. दहा पेक्षा जास्त व्यक्तींचा त्याने जीव घेतला होता. त्यामुळे या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्याचे काम शार्पशूटरला दिले होते. मात्र, काही दिवसांपासून हा बिबट्या चकवा देण्यात यशस्वी होत होता. काल या बिबट्याला मारण्यासाठी बिटरगाव (ता. करमाळा) येथे वनविभागाने सापळा लावला होता. आज वांगी येथील शेतकऱ्यांना गुरुवारी सायंकाळी बिबट्याने दर्शन दिले होते. त्यानंतर रात्रीपासूनच त्याला ठार करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. सोलापूर वन विभाग आणि पुणे येथील रायफल क्‍लबचे चंद्रकांत मंडलिक या शार्प शूटरच्या मदतीने अखेर गोळ्या घालून या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आले, त्यामुळे नगर जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात बिबट्याच्या भितीने शेतकरी शेतातही एकटे जाऊ शकत नाही. गटाने लोक शेतात काम करीत आहेत. रात्री वीज असल्याने अनेकदा शेतकऱ्यांना रात्रीच पाणी द्यावे लागते. पर्यायाने शेतकरी रात्रीच पाणी भरीत होता. बिबट्यामुळे मात्र शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे मुश्किल होत आहे. गेल्या महिनाभरापासून शेतकरी रात्री शेतात जाऊ शकत नव्हता. इतर वेळी अनेकदा बिबट्या दिसतो, मात्र माणसांवर हल्ले जास्त होत नव्हते. नरभक्षक बिबट्या मात्र माणसांवरच हल्ले करीत होता. आता या बिबट्याला ठार केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधूनसमाधान व्यक्त होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post