इम्रान खाननं माझ्या घरात ड्रग्ज सेवन केलं; माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

 


माय अहमदनगर वेब टीम

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान कायम कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. मात्र सध्या पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे तो चर्चेत आला आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सर्फराज नवाझ याने नुकतीच पाकिस्तानी प्रसारमाध्यमाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने पंतप्रधान इम्रान खान नियमित चरस आणि कोकेन यांसारख्या अंमली पदार्थांचे (ड्रग्स) सेवन करत असल्याचा धक्कादायक दावा केला.

“इम्रान खान ड्रग्ससेवन करतो. लंडनमध्ये असताना त्याने चरस ओढली होती. इतकंच नव्हे, तर माझ्या घरातही त्याने ड्रग्सचं सेवन केलं होतं. १९८७ साली पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेट सामना झाला. त्यात त्याची गोलंदाजी चांगली झाली नाही. त्यावेळी तो माझ्या इस्लामाबादच्या घरी आला होता. मोहसीन खान, अब्दुल कादीर, सलीम मलिक सारेच माझ्या घरी जेवायला आले होते. त्यावेळी इम्रानने माझ्या घरात चरस ओढली आणि कोकेन ड्रग्सचंही सेवन केलं. लंडनमध्ये असताना तो काहीतरी अंमली पदार्थ रोल करायचा आणि तो (सिगारेटप्रमाणे) ओढायचा”, असा दावा नवाझ यांनी व्हिडीओ मुलाखतीत केला.

“इम्रानला माझ्यासमोर आणा. बघू तो ही गोष्ट केल्याचं नाकारतो का? मी या गोष्टीचा एकमेव साक्षीदार नाहीये. लंडनमध्ये अनेकांनी त्याला ड्रग्ससेवन करताना पाहिलं आहे.

इम्रान खानवर ड्रग्ससेवन करण्याचे आरोप याआधी करण्यात आले आहेत. इम्रान खानची पूर्वाश्रमीची पत्नी रहम खान हिनेही इम्रान खानवर विवाहबाह्य संबंध आणि ड्रग्ससेवनाचे आरोप लावले होते. रहमने तर इम्रानविरोधात कौटुंबिक हिंसाचार केल्याचा आरोपही केला होता. रहम खानने आपल्या पुस्तकात इम्रान खान हेरॉईन ड्रग्स आणि इतर बंदी घातलेल्या ड्रग्सचं सेवन करत असल्याचं नमूद केलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post