मेट्रो कारशेड वाद; आदित्य ठाकरेंनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई: कांजूर मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर राज्यात नवीन वादाला तोंड फुटलं आहे. यावर आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कांजूरमार्गची जागा राज्य सरकारचीच आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 

मुंबई मेट्रोच्या नव्या प्रकल्पासाठी आरे कॉलनी ऐवजी कांजूरमार्गमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं नुकताच घेतला होता. मात्र, केंद्र सरकारनं त्यास आक्षेप घेत कारशेडचं काम थांबवण्याच्या सूचना राज्याला केल्या आहेत. यावरुन आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

'महसूल नोंदीनुसार कांजूरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएला देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा एमएमआरडीएला कारशेड डेपो तयार करण्यासाठी दिली आहे. तशी नोंदच महसूल विभागाच्या खात्यात आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही जागा एमएमआरडीएला देण्यात आली आहे. त्यामुळं या पुढेही एमएमआरडीए याआधी प्रमाणेचं मेट्रो कारशेडचे काम सुरु ठेवणार आहे,' अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. 

काय आहे वाद? 

कांजूरमार्ग येथे मेट्रोचं कारशेड स्थलांतरित केल्यानंतर एमएमआरडीएनं कामाला सुरूवात केली आहे. यावरुन, केंद्रानं राज्याला सविस्तर पत्र लिहलं आहे. 'कांजूरमार्गची जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची असून आम्ही त्यावरील आमचा हक्क अद्याप सोडला नाही. याआधीही एमएमआरडीएचा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळं आमच्या परस्पर कारशेडचं काम सुरु करणं चुकीच आहे. कारशेडचं काम थांबवा,' असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post