दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक

 माय अहमदनगर वेब टीम

दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला असून जैश-ए-मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.  दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून सध्या या दोन्ही संशयित दहशतवाद्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिली आहे.

एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, “अटकेची कारवाई करण्यासाठी सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मिलेनियम पार्कजवळ सापळा रचण्यात आला होता. जम्मू काश्मीरचे निवासी असणाऱ्या या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे दोन अॅटोमॅटिक पिस्तूल आणि १० जिवंत काडतूसं सापडली आहेत”.


अटक करण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दोन्ही संशयित दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. अब्दुल लतिफ मीर आणि मोहम्मद अशरफ खतना अशी या दोघांची नावे आहेत. अब्दुलचं वय २२ असून तो बारामुल्लाचा रहिवासी आहे तर २० वर्षीय अशरफ कुपवारामध्ये वास्तव्यास आहे. ऑगस्ट महिन्यातही दिल्ली पोलिसांनी आयएसच्या दहशतवाद्याला अटक करत हल्ल्याचा कट उधळला होता. पोलिसांनी यावेळी १३ किलो आईडी जप्त केलं होतं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post