टीआरपी घोटाळ्यात ईडीने घेतली उडी; 'या' आधारावर गुन्हा दाखल

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई:टीआरपी घोटाळा प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने उडी घेतली आहे. ईडीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या एफआयआरचा आधार घेऊन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अनेक वृत्त वाहिन्यांनी बनावट टीआरपी आकडे तयार केल्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीचा संशय आहे. या माध्यमातून ज्या आर्थिक उलाढाली झाल्या त्यात मनी लाँड्रिंग झाल्याचा ईडीचा संशय आहे. त्यानुसार ईडीच्या बेलार्ड पियर येथील क्षेत्रीय संचालनालयाने शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे (एफआयआर) हा गुन्हा दाखल करण्यात आला असून मनी लाँड्रिंग संबंधीच तपास केला जाईल, असे ईडीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता याप्रकरणी तपासाला अधिकच वेग येणार आहे.संबंधित वाहिन्यांचे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे एफआयआरमध्ये असून त्यांचे नव्याने जबाब नोंदवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, रेटिंग एजन्सी 'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल '(BARC) ने हंसा रिसर्च ग्रुपच्या माध्यमातून सर्वप्रथम याबाबत तक्रार केली होती. काही वाहिन्या टीआरपीच्या आकड्यांत फेरफार करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली होती. टीआरपी रेटिंग वाढवण्यासाठी काही वाहिन्या पैशांचं वाटप करत होत्या. विशिष्ट वाहिनी पाहण्यासाठी घरोघरी पैसे वाटण्यात आल्याचेही तपासात स्पष्ट झाले होते. दरम्यान, आता ईडीने या प्रकरणात उडी घेतल्याने टीआरपी घोटाळ्यात नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post