बीपीसीएल’ ग्राहकांना ‘एलपीजी’ अनुदान कायम – प्रधान

 


माय अहमदनगर वेब टीम

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)च्या ग्राहकांना खासगीकरणानंतरही स्वयंपाकासाठीच्या गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान कायम असेल, केंद्रीय तेल व वायू मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी शुक्रवारी सांगितले.

प्रधान म्हणाले की, स्वयंपाकाच्या गॅससाठी ग्राहकांना थेट अनुदान दिले जाते. ते कोणत्याही कंपनीला व्यक्तिगतरीत्या दिले जात नाही. वायू विकणाऱ्या कंपनीची मालकी कोणत्याही भौतिक परिणामाची नसते, असे प्रधान यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

अनुदान थेट ग्राहकांना दिले जात असल्याने वायुपुरवठादार कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील किंवा खासगी क्षेत्रातील असली तरी काहीही फरक पडणार नाही, असे ते म्हणाले.

प्रधान म्हणाले की, सर्व ग्राहकांना एलपीजी अनुदानाची रक्कम डिजिटल पद्धतीने दिली जाते. त्या सर्वांना शासकीय अनुदान मिळणारच आहे.

सरकारकडून अनुदान आगाऊ दिले जाते आणि ग्राहक त्याचा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), बीपीसीएल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) च्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या ‘एलपीजी रिफिल’ खरेदीसाठी उपयोग करतात. अनुदानाचा वापर करून ‘रिफिल’ केल्याच्या क्षणी, आणखी एक हप्ता वापरकर्त्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाते.

बीपीसीएलच्या ग्राहकांना काही वर्षांनंतर आयओसी आणि एचपीसीएलकडे वर्ग करण्यात येईल का, असे विचारले असता ते म्हणाले की, आतापर्यंत असा कोणताही प्रस्ताव नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकार अनुदान दराने दरवर्षी प्रत्येक कुटुंबांना प्रत्येकी १४.२ किलो ग्रॅमचे १२ स्वयंपाकाचे गॅस (एलपीजी) सिलिंडर देते. हे अनुदान थेट वापरकर्त्यांच्या बँक खात्यात जमा होते.

कंपनीतील निर्गुतवणुकीच्या रकमेमधून २.१० लाख कोटी रुपये सरकार जमा करणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील भारत पेट्रोलियममधील व्यवस्थापन नियंत्रणासह सरकार तिचा संपूर्ण ५३ टक्के हिस्सा विकण्याच्या प्रक्रियेत सध्या आहे. यानुसार कंपनी अधिग्रहण करणाऱ्यांना भारतातील तेल शुद्धीकरण क्षमतेच्या १५.३३ टक्के आणि इंधन विपणनाचा २२ टक्के हिस्सा मिळेल.

देशातील २८.५० कोटी एलपीजी ग्राहकांपैकी भारत पेट्रोलियम ७.३ कोटी ग्राहकांना सेवा देते. तर कंपनीचे देशात १७,३५५ पेट्रोलपंप, ६,१५९ एलपीजी वितरण संस्था, आणि ५१ विमान इंधन केंद्रे आहेत.

बीपीसीएलच्या मुंबई (महाराष्ट्र), कोची (केरळ), बीना (मध्य प्रदेश) आणि नुमालीगड (आसाम) येथे चार इंधन शुद्धीकरण प्रकल्प आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post