माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याच्या मुद्द्यावरून 'आपण सेक्युलर झालात का?' अशी विचारणा करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पत्र आणि त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेचच स्पष्ट आणि परखड शब्दांत दिलेले उत्तर देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. या 'लेटरवॉर'चे पडसाद अजूनही पाहायला मिळत असून आता महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील १०४ मान्यवरांनी एक खुलं पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, शांता गोखले, जयंत पवार, नीरजा, डॉ. हेमचंद्र प्रधान, डॉ. सुधीर पानसे, मुक्ता दाभोलकर, विश्वास उटगी, मिलिंद मुरुगकर, राज कुलकर्णी आदी मान्यवरांचा यात समावेश असून मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्रानंतर जी ठाम भूमिका घेतली त्याचे या सर्वांनीच कौतुक केले आहे. 'जेव्हा प्रश्न श्रद्धांचा असतो तेव्हा अशी ठाम भूमिका घेणे राजकीय दृष्ट्या कठीण असले तरी आपण ती भूमिका ठामपणे घेतली आणि सेक्युलॅरिझमच्या (धर्मनिरपेक्षता) बाजूने उभे राहिलात व त्याची राज्यपालांनाही स्पष्ट शब्दांत जाणीव करून दिली त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार', असे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात या मान्यवरांनी नमूद केले आहे.
घटनेतील धर्म-स्वातंत्र्यासंबधीचे कलम २५ हे आरोग्याला बाधा येत असल्यास आवश्यक ते प्रतिबंध धर्म-स्वातंत्र्यावर लावण्याचा अधिकार सरकारला देते, असे नमूद करत या मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठी उपयोग आक्षेपार्ह आहे. असे श्रद्धांचा उपयोग करून केलेले राजकारण यशस्वी झाले व त्यातून देवळे उघडली गेली तर ते भाविकांसाठीच धोक्याचे ठरू शकते, अशी भीती व्यक्त करत अप्रत्यक्षपणे भाजपच्या आंदोलनावर पत्रात टीका करण्यात आली आहे. हिंदू धर्मातील भागवत परंपरा ही कर्मकांड नाकारणारी, देव फक्त मंदिरातच असतो हे नाकारणारी परंपरा आहे. हे पत्र लिहिणारे आम्ही सर्वच ही परंपरा मानणारे आहोत. मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्यात आनंद असतोच पण
'देव देव्हाऱ्यात नाही, देव मूर्तीत ना मावे,
तीर्थ क्षेत्रात ना गावे, देव आपणात आहे,
शीर झुकवोनिया पाहे'
अशी माणसाला व्यापक करणारी परंपरा आम्ही मानतो. ही परंपरा स्वाभाविकपणे कर्मकांडाला नकार देणारी असल्याने लोकांच्या श्रद्धेचे होणारे सवंग राजकारण नाकारणारी आहे. सेक्युलर माणूस धार्मिक असू शकतो, श्रद्धाळूही असू शकतो. पण शासनाची भूमिका या श्रद्धेमुळे न ठरता लोकांचे ऐहिक हित लक्षात घेऊन ठरली पाहिजे, असे हा सेक्युलर माणूस मानतो, असेही पत्रात अधोरेखित करण्यात आले आहे.
Post a Comment