संकटकाळी शरद पवारच; विरोधक बिहारमध्ये

 


माय अहमदनगर वेब टीम

बीड : सत्ता असो किंवा नसो, राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठीच बांधावर आहोत आणि विरोधक मात्र बिहारमध्ये निवडणुकीत व्यस्त आहेत. संकटकाळी शरद पवारच धावून येतात असे स्पष्ट करत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील हिरापूर, ईटकूर, मिरकाळा, मादळमोही (ता.गेवराई) येथे रविवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची पाहणी केली. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम उपस्थित होते. कापूस, सोयाबीन आणि आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुंडे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा करुन पंचनाम्याबाबत माहिती घेतली. यावेळी मंत्री मुंडे म्हणाले, जिल्ह्याला नेहमीच दुष्काळाचा फटका बसतो. यावर्षी खरीप हंगामातील पिके तिसऱ्यांदा अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत.  राज्य सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणारच आहे. मात्र, त्यांना विमा देखील मिळाला पाहिजे. जिल्ह्यातील १७ लाख ५० हजार शेतकऱ्यांनी पिकांचा विमा भरलेला आहे. कृषी विभागाच्या यंत्रणेने केलेले पंचनामे ग्रा धरुन विमा कंपनीने भरपाई द्यावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेत असो किंवा नसो नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने शरद पवारच उभे राहतात असे धनंजय मुंडे म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post