समूह संसर्ग झाल्याची अखेर केंद्र सरकारकडून कबुली

 


माय अहमदनगर वेब टीम

नवीदिल्ली - देशात कोरोना महारोगराईचा प्रकोप सुरु झाला तेव्हापासून आतापर्यंत एक लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पंरतू, सातत्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत होते. पहिल्यांदाच देशात कोरोना संसर्ग सामूहिक फैलावाच्या उंबरठ्यावर पोहचला असल्याची कबुली रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. 


कोरोनाचा हा सामूहिक संसर्ग केवळ काही जिल्हे तसेच राज्यांपूरताच मर्यादित असल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दिली. 'रविवार संवाद' कार्यक्रमात कोरोनासंबंधी देशवासियांच्या प्रश्नांची उत्तर देतांना हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. 


पश्चिम बंगालमधील काही भागात कोरोनाचा समुह फैलाव झाल्याची उदाहरणे दिसून आली आहेत. सणासुदीत त्यामुळे योग्य काळजी घेत कोरोनासंबंधित नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन नुकतेच मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्याकडून करण्यात आले होते. बनर्जी यांच्या वक्तव्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे सामूहिक संसर्गाबद्दलच्या वक्तव्यामुळे सर्वसामान्यांना धडकी भरली आहे.


या कार्यक्रमातून डॉ.हर्षवर्धन देशभरातून आलेल्या काही निवडक प्रश्नांची उत्तर देतात. पश्चिम बंगाल प्रमाणे देशातील इतर राज्यात सामूहिक संसर्गाची उदारहणे दिसून येत आहेत का? असा प्रश्न यंदा आरोग्य मंत्र्यांना विचारण्यात आला होता. 


या प्रश्नाचे उत्तर देतांना ते म्हणाले की, पश्चिम बंगालसह विविध राज्यातील वेगवेगळ्या भागत सामूहिक संसर्ग झाला असल्याची शक्यता आहे. विशेषतः घनदाट लोकवस्तीत कोरोनाचा फैलाव वेगाने होण्याचे प्रमाण अधिक आहे. पंरतु, संपूर्ण देशात कोरोनाचा समूह संसर्ग झालेला नाही. केवळ काही निवडक राज्यातील काही जिल्ह्यांपर्यंतच कोरोना संसर्गाचा प्रभाव मर्यादीत आहे. पहिल्यांदाच हर्षवर्धन यांनी कोरोनाच्या सामूहिक संसर्गाबद्दल कबुली दिली आहे. यापूर्वी ​समूहसंसर्गाची सुरुवात झालेली नाही असेच मंत्रालयाकडून सांगण्यात येत होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post