पचनाशी संबंधित समस्येमुळे त्रस्त आहात का? कोणत्या वेळेस ताक पिणं ठरेल योग्यमाय अहमदनगर वेब टीम

हेल्थ डेस्क - धावपळीचे आयुष्य, कामाचा ताणतणाव, वेळी-अवेळी खाण्यापिण्याची सवय यामुळे पचनसंस्थेवर  दुष्परिणाम होतात. व्यस्त जीवनशैलीमध्ये पचनसंस्था निरोगी ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे. तुम्ही स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेत आहात. पण कधी- कधी काही कारणांमुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. पचनप्रक्रिया सुरळीत सुरू ठेवण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आपण जाणून घेऊया.


दुपारच्या वेळेस का प्यावे ताक? 

ताक पिण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी स्पष्टपणे माहीत असणे आवश्यक आहे. या पेयाद्वारे आरोग्यदायी लाभ मिळावेत तसंच घशाशी संबंधित आजार किंवा सर्दी खोकला होऊ नये, अशी इच्छा असल्यास केवळ दुपारच्या वेळेसच ताक प्यावे.

एखाद्या अवयवामध्ये तीव्र स्वरुपात वेदना होतअसतील, शरीर जड झाल्यासारखे जाणवत असेल तर संध्याकाळनंतर कोणत्याही परिस्थितीत ताक पिऊ नये. अन्यथा आपल्याला रात्रभर अंगदुखी, वेदना इत्यादी त्रासामुळे झोप येणार नाही.


​ताक पिण्याचे फायदे

- ताक हे पेय पचनासाठी अतिशय हलके आहे. ताकाच्या सेवनामुळे पचनाशी संबंधित सर्व प्रकारचे विकार दूर होण्यास आणि पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते.

- ताक प्यायल्याने अपचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत. ज्या लोकांचे पोट स्वच्छ होत नाही किंवा ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशा लोकांनी नियमित स्वरुपात ताकाचे सेवन करावे.

- नियमित स्वरुपात ताक प्यायल्यास गॅस, अपचन आणि पोट जड होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत नाही.

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी ताकात मिसळा या गोष्टी

ताकाची चव वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरुपातील सामग्री मिक्स करू शकता. आपण येथे ताकाची चव वाढवण्यास आणि आरोग्यास लाभदायक असणाऱ्या काही सामग्रींविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

काळे मीठ

सामान्य मिठाऐवजी सैंधव मीठ मिक्स करून ताक प्यावे. काळे मीठ आपल्या पचन प्रक्रियेसाठी पोषक असते.

औषधी काळी मिरी

काळी मिरी

काळी मिरी कुटून किंवा काळ्या मिरीची पावडर मिक्स करून तुम्ही ताकाचे सेवन करू शकता. काळ्या मिरीतील औषधी गुणधर्म घसा आणि फुफ्फुसामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग वाढू देत नाहीत.

ओवा

ओव्याची फोडणी देऊन किंवा ओव्याची पूड मिक्स करून तुम्ही ताक प्यायल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळेल. तसंच वारंवार तहान लागण्याच्या समस्यापासूनही सुटका मिळेल.

​पुदिनायुक्त ताक

ताकामध्ये पुदिन्याची पावडर किंवा पुदिन्याची पाने मिक्स करून प्यायल्यास शरीराला थंडावा मिळेल. पोटात होणारी जळजळ शांत करण्यासाठी पुदिन्याचे ताक प्यावे. पुदिन्यातील औषधी गुणधर्मामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते.

​ताक पिण्याची योग्य वेळ

- पचनाशी संबंधित समस्यांचा तुम्ही सामना करत आहात का? तर दुपारच्या जेवणानंतर जवळपास तासाभरानंतर ताक प्यावे.

- नाश्ता आणि दुपारचे जेवण यातील मधल्या वेळेत तुम्ही ताक पिऊ शकता. या वेळेसही ताक पिणे लाभदायक ठरू शकते. पण थंड हवामानात ताक पिणे टाळावे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post