कोंबडा आरवला नाही तरी सकाळ होते!; फडणवीसांवर राष्ट्रवादीने डागली तोफ


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - 'कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची थांबत नाही. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे', अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. 

माझ्यामुळे इतर पक्षाचे लोक बाहेर फिरायला लागले असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोंबडयाला वाटतं की मी आरवलो नाही तर सकाळ होणारच नाही पण प्रत्यक्षात तसं काहीही नसतं. कोंबडा झोपला तरी सकाळ होते हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यायला हवे, असा टोला मलिक यांनी लगावला.

'आमचे नेते पवारसाहेब असतील किंवा मंत्री असतील सर्वच जण शेतकरी अडचणीत आल्यावर त्यांना धीर देण्यासाठी शेताच्या बांधावर पोहचतात. शेतकऱ्याला धीर देणं ही पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उगाचच काहीही दावे करू नयेत,' असा सल्ला मलिक यांनी दिला

सरकार लवकरच मदत जाहीर करेल

कुठल्याही शेतकऱ्याला या अडचणीच्या काळात अडचणीत राहू देणार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकार घेणार आहे. येत्या कॅबिनेटच्या बैठकीत सरकार निश्चितरूपाने मदत जाहीर केली जाईल, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा दौऱ्यावर आहेत.ते दौऱ्याहून परत आल्यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे भरपाई देण्याची भूमिका असेल. त्याचबरोबर इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावर केंद्राचीही मदत करण्याची जबाबदारी असल्याचेही नवाब मलिक यांनी नमूद केले.

मदतीवरून राजकारण तापलं

परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा महाराष्ट्राच्या विविध विभागांना बसला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वेगवेगळ्या भागांत दौरे करत आहेत. या निमित्ताने राजकारणही बरंच तापलं आहे. फडणवीस यांनी सरकारवर टीका केल्यानंतर त्याला मुख्यमंत्री ठाकरे आणि पवारांकडूनही उत्तर मिळालं आहे. त्यात आता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडून फडणवीसांवर बोचऱ्या शब्दांत टीका झाल्याने हे वाकयुद्ध अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post