मराठा समाजाने केंद्र सरकारला दिला 'हा' इशारा



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर: मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत राज्य सरकारविरूद्ध सुरू असलेला एल्गार आता व्यापक करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाने आता केंद्र सरकारलही इशारा दिला असून सोमवारी (५ ऑक्टोबर) सर्व तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहे. मराठा समाजाच्या सहनशीलतेचा आणखी अंत न पाहता मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाचा वणवा पुन्हा पेटल्यास त्यास केंद्र व राज्य सरकार पूर्णतः जबाबदार राहील, अशा इशाराही देण्यात आला आहे.सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने हा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने मराठा आरक्षणास संरक्षण देण्यासाठी संसदेत स्वतंत्र कायदा करावा, सर्वोच्च न्यायालयातून जलद न्याय मिळण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करावा, अशीही मागणी आता करण्यात आली आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या (सोमवारी) तहसिल कार्यालयांसमोर धरणे आंदोलन होणार आहे. एसईबीसी प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने आपल्या नियंत्रणाखालील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये १२ टक्के जागा मराठा विद्यार्थ्यासाठी वाढवाव्यात, मराठा आरक्षणास स्थगिती असेपर्यंत पोलीस भरती व इतर कोणतीही नोकर भरती करण्यात येऊ नये, स्थगिती उठल्याशिवाय एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नयेत, केंद्र सरकारने मराठा आरक्षणास संरक्षण देण्यासाठी संसदेत स्वतंत्र कायदा करावा, मराठा समाजास आर्थिक मागास प्रवर्ग नव्हे तर हक्काचे स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे, सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास भरीव निधी देण्यात यावा, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण सुनावणीसाठी घटनापीठ स्थापन करण्यासाठी आग्रही पाठपुरावा करून मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी, कोपर्डी अत्याचार घटनेतील आरोपींवरील मुंबई उच्च न्यायालयातील खटल्याचे कामकाज जलद गतीने सुरू करावे, अशा मागण्या करण्यात आल्याचे समन्वयक संजीव भोर यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post