फडणवीसांचं 'पहाटेचं सरकार' पुन्हा चर्चेत; नीलेश राणेंचं 'हे' ट्विट राष्ट्रवादीला झोंबलं




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई: 'भाजपने काही लोकांना बडबड करण्याचा ठेका दिला असून त्यातील एक कंत्राटदार नीलेश राणे आहेत. त्यांनी आता जे वक्तव्य केले आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस काडीचीही किंमत देत नाही', अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पलटवार करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नीलेश राणे यांनी टीका केली आहे. त्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'भाजपाने लोकांच्या व शेतकऱ्यांच्या जीवाची होळी केली आहे. देशाची अर्थव्यवस्था लयाला नेली आहे. याकडे लक्ष जावू नये म्हणून काही लोकांना बडबड करण्याचा ठेका दिला आहे आणि निलेश राणे हे त्यातीलच एक आहेत', असा थेट हल्लाच तपासे यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांचं पहाटेचं सरकार वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारीच प्रयत्नशील होते, असा दावा शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या आजच्या अग्रलेखात करण्यात आला आहे. 'पहाटेचे मुख्यमंत्री' फडणवीसांची मर्जी राखण्यासाठी गुप्तचर खातंच काम करत होतं, असा दावाही करण्यात आला आहे. या दाव्यामुळे ठिगणी पडली आणि भाजपकडून नीलेश राणे यांनी यात उडी घेत शिवसेनेचा समाचार घेतलाच शिवाय अजित पवार आणि शरद पवार यांच्यावरही शरसंधान केले. नीलेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.

'शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजप-राष्ट्रवादी सरकारच्या शपथविधीवर टीका करते. मग अजित पवार पहाटे पहाटे राजभवनावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. शरद पवार यांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच केला आहे', असे खोचक ट्विट नीलेश राणे यांनी केले. राणे यांच्या याच ट्विटवरून राष्ट्रवादीचा संताप झाला असून राष्ट्रवादीने सडेतोड भाषेत त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post