मुंबईतील ८० ते १०० वर्षे जुन्या इमारतींची यादी तयार करणार

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई  - महिन्याभरातील मुंबईत दोन इमारतींच्या दुर्घटनेत १२ रहिवाशांचा मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबईतील सर्व ८० ते १०० वर्ष पूर्ण झालेल्या व १९८२ ते ८७ या काळात बांधलेल्या इमारतींच्या याद्या तयार करण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका अधिका-यांना दिले आहेत.

धोकादायक इमारती व त्यांच्या पुनर्विकासाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी लवकरच नगरविकास मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. फोर्ट येथील भानुशाली इमारत व गेल्या आठवड्यात नागपाडा येथील मिश्रा इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत आढावा घेण्यासाठी महापौरांनी भायखळाच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षात सर्व विभागाचे कार्यकारी अभियंता (पदनिर्देशित अधिकारी) यांची आढावा बैठक घेतली

या बैठकीत २४ विभागांमधील पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडून त्यांच्या विभागातील धोकादायक इमारतींची सविस्तर माहिती महापौरांनी जाणून घेतली.मुंबईतील सर्व ८० ते शंभर वर्षे जुन्या इमारतींची यादी आणि १९८२ ते ८७ या काळातील इमारती अशा दोन वेगळ्या याद्या तयार करण्याची सूचना महापौरांनी केली.

ज्या ठिकाणी भाडेकरू आणि मालक एकत्र येऊन इमारतींचा पुनर्विकास करत असतील, त्यांच्याबाबत महापालिकेने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. मात्र पुनर्विकासाबाबत मालक किंवा विकासक ऐकत नसल्यास तेथे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना महापौरांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post