'त्यांची' राजकीय फायद्यासाठी धडपड; मलिक यांची टीकास्त्र

 

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - 'राजकारण करणं हे भाजपचे कामच आहे. सध्या संकटाच्या काळात जनतेसोबत उभे राहण्यापेक्षा त्यामधून राजकीय फायदा कसा मिळेल, त्या पद्धतीने विरोधक पावले टाकत आहेत,' असा घणाघाती आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला. राज्यातील जनता सर्व पाहत आहे. कोण जबाबदारीने काम करीत आहे, कोण बेजबाबदारीने वागतंय, हे जनताच ठरवणार आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे आज मुंबई येथून परभणीला जात असताना नगरला थांबले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील भाजपच्या नेत्यांवर तोफ डागली. राज्यात कोविडचे संकट असताना भाजप  विविध मुद्द्यावरून राजकारण करून महाविकास आघाडी सरकारवर आरोप करीत आहे का? असे मलिक यांना विचारले असता ते म्हणाले, 'भाजपचे काम हे राजकारण करणं आहे. पण जनता उघड्या डोळ्यांनी सर्व काही पाहत आहे. विनाकारण बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एखाद्या आत्महत्येचा बाऊ केला जातोय. एखादी घटना झाली, त्याच्या बाबतीत ते सांगतात. परंतु कुठेतरी या संकटाच्या काळात जनतेसोबत उभे राहण्यापेक्षा राजकीय फायदा कसा मिळेल, त्या पद्धतीने विरोधक पावले टाकताय,' अशी टीकाही त्यांनी केली. राज्यातील जनता सर्व पाहतेय. कोण जबाबदारीने काम करीत आहे, कोण बेजबाबदारीने करतय, हे जनताच ठरवणार आहे,' असेही ते म्हणाले.

दरम्यान, राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत सातत्याने विविध संघटनांकडून मागणी होत आहे. त्याबाबत मलिक यांना विचारले असता, धार्मिक स्थळे उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मुळात देव हा सर्व ठिकाणी असतो. निश्चित धार्मिक स्थळे उघडण्याबाबत लोक मागणी करीत आहे. पण सरकार जो निर्णय घेत आहे तो जनतेच्या हिताचाच आहे. कारण धार्मिक स्थळी गर्दी होऊन करोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्यामुळे लोकांची अडचण होईल. त्यामुळे सरकार सावधपणे भूमिका घेत आहे, असंही ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post