नगरमध्ये शिवसेना स्टाइल आंदोलन; खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - नगर शहरातील खड्ड्यावरून आज शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसले. खड्ड्यांमुळे नगर शहरातील रस्त्यांची दैयनीय अवस्था दाखवण्यासाठी शिवसैनिकांनी थेट महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनाच नगर शहरात पायी फिरवले. तसेच काही खड्ड्यामध्ये फुले-हार घालून पूजा करीत गांधीगिरी करण्यात आली. दरम्यान, यावेळी शिवसैनिकांनी महापालिका प्रशासन तसेच महापौर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

खड्ड्यांमुळे नगर शहरासह सावेडी उपनगरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. त्यातच गेल्या सात ते आठ दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे या खड्डयांमध्ये पाणी साचत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून अपघात सुद्धा होऊ लागली आहे. हे खड्डे बुजवण्याची मागणी वारंवार करण्यात येत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अखेर शिवसेनेने आज आक्रमक होत चक्क मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनाच खड्डेमय रस्त्यांवरून पायी फिरवले.

आज शिवसैनिक सर्वात प्रथम महापालिका कार्यालयात गेले. त्याठिकाणी त्यांनी निवेदन दिले, व रस्ते पाहण्यासाठी आयुक्तांना निमंत्रण दिले. मात्र, आयुक्तांना त्यास नकार देताच आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. अखेर आयुक्त रस्ते पाहण्यास तयार झाले. आयुक्त व शिवसैनिक हे जुन्या महापालिका इमारत जवळील शनी चौकात आले. तेथून आयुक्तांना पायी फिरवत खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था शिवसैनिकांनी दाखवली. तसेच आठ दिवसात हे खड्डे बुजवा, अशी मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव यांच्यासह आदी शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post