करोनाने नगर जिल्ह्याची चिंता वाढली, २४ रुग्णांचा मृत्यू

 माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - नगर जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढण्याचा वेग कायम आहे. जिल्हा प्रशासनाचा बुधवारी सायंकाळी सातचा अहवाल व गुरुवारी रात्री पावणे आठचा अहवाल विचारात घेतल्यास याकाळात करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा तब्बल २४ ने वाढला आहे. त्यामुळे नगरकरांच्या चिंतेमध्ये भर पडताना दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या २४ तासात ६३२ करोना बाधित वाढले असून एकूण बाधितांचा आकडा हा आता २३ हजार ३३६ झाला आहे.


नगर जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर दररोज सरासरी चारशे ते पाचशेपेक्षा जास्त करोना बाधित रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. त्यातच आता करोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडा देखील वाढू लागला आहे.


नगरच्या जिल्हा प्रशासनाच्या काल सायंकाळी सात वाजताच्या अहवालामध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३०६ एवढी होती. मार्च महिन्यापासून ते काल सायंकाळी सात वाजेपर्यंत नोंद झालेला हा मृत्यूचा आकडा होता. हा आकडा आज दुपारी बारापर्यंत ३१८ वर गेला होता. तर, आज रात्री पावणे आठच्या अहवालामध्ये मृत्यूचा हा आकडा तब्बल ३३० दाखवण्यात आला आहे. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा हा आकडा आता चिंता वाढवणारा ठरू लागला असून प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post