नगर येथील मराठा समाजाने घेतला 'हा' निर्णय

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर -  सुप्रिम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सकल मराठा समाजाच्यावतीने (दि. 14 ) रोजी गुरुदत्त लॉन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने सर्व समाजातील संघटना व इतर राजकीय पक्षातील नेत्यांना आपले राजकीय जोडे बाजुला ठेवून शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी लढा उभारायचा आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शाळे-कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच आर्थिक नुकसानही होईल.  मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये आरक्षण मिळणार नसल्यामुळे गोरगरीब मराठा समाजातील मुलांचे नुकसान होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. सरकारने लवकरात लवकर सक्षम बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अशी मागणी येत्या दोन दिवसात जिल्हाधिकारी यांच्याकडे सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात येणार असून, आरक्षण मिळविण्यासाठी पुढील वाटचाल ठरविली जाईल, असे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे यांनी केले.

सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षणासंदर्भातील वाटचालीसाठी आयोजित बैठकीत बोलताना अध्यक्ष चंद्रकांत गाडे, बाबासाहेब गिरवले, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, सुरेश इथापे, विठ्ठल गुंजाळ, रेखा जरे, शरद दळवी, सोमनाथ कराळे, विश्वजीत डोके, अतुल लहारे, श्रीकांत निंबाळकर, श्री. भालसिंग आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना विठ्ठल गुंजाळ म्हणाले की, सर्व समाजाने एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने एकत्र लढा उभा करायचा आहे. सरकार आपल्या बरोबर आहे. सरकारने आरक्षण मिळविण्यासाठी सर्व कागदपत्रे पुरविली आहे. राज्यपातळीवर सकल मराठा समाजाचे नियोजन होईल, त्यादृष्टीने वाटचाल केली जाईल असे ते म्हणाले.

यावेळी निखिल वारे म्हणाले की, मराठा समाज हा नगर जिल्ह्यामध्ये प्रथम कोपर्डी प्रकरणानंतर एकत्र आला होता. निष्पाप मुलीला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही. नराधाम आरोपींना आजतागायत फाशी झाली नाही. तरी लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निर्णय घेऊन त्यांना फाशी देण्यात यावी. मराठा समाजाचा अंत आता पाहू नये. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्पेशल कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी बाळासाहेब पवार म्हणाले की, सर्व आमदार, खासदारांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मदत करावी. नोकरीसंदर्भातील जी स्थगिती दिली आहे, ते उठविण्यासाठी प्रयत्न करणे, सरकारने विशेषबाब म्हणून अद्यादेश काढावा, विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, याकडे सरकारने लक्ष द्यावे. पाच वर्षांपासून आरक्षणासाठी मराठा समाज लढत आहे. परंतु आजपर्यंत आरक्षण मिळाले नाही. यामुळे मराठा समाजाचा विश्वास उडेल. यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा देण्याची गरज आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post