थोड्याच दिवसांत राज्यात भाजपचे सरकार! - माजी मंत्री कर्डिले

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच नगरमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी थोड्याच दिवसांत राज्यामध्ये भाजपचे सरकार येणार आहे व नगरमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक आमच्या सोबत येणार आहेत, असा दावा केला आहे. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्यामध्ये आज बैठक झाली. या बैठकीनंतर ते बोलत होते. 

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या निवडीनंतर नगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक मनोज कोतकर यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली. त्यानंतर आमदार संग्राम जगताप हे माध्यमांशी बोलत असताना त्यांना भाजपचे आणखी काही नगरसेवक संपर्कात आहेत का ?, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले होते की, ‘आहेत. निश्चित रूपाने येत्या काळात अनेक लोक येतील.’ याबाबत आज माजी मंत्री कर्डिले यांना विचारले असता त्यांनी राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचेच नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

वाचा: राजकारणात कुणी मित्र किंवा दुश्मन नसतोः शिवसेना

कर्डिले म्हणाले, ‘राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचे लोक आमच्या संपर्कात आहेत. कारण त्यांना माहिती आहे की थोड्याच दिवसांत राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. देशात आमचे सरकार आहेत. त्यामुळे थोड्याच दिवसात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक आमच्या सोबत येतील.’ दरम्यान, स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपच्या नगरसेवकाची वर्णी लागावी, यासाठी भाजपनेच राष्ट्रवादीमध्ये नगरसेवक पाठवल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत कर्डिले यांना तुम्हीच नगरसेवक राष्ट्रवादीत पाठवले का, असे विचारले असता ते म्हणाले, ‘आम्हाला राष्ट्रवादीत नगरसेवक पाठवायची गरज नाही. ते त्यांच्या स्वार्थासाठी किंवा पदासाठी गेले असावेत. त्याबाबतचा सविस्तर खुलासा शहाराध्यक्ष व महापौर यांनी केला आहे. संबंधित नगरसेवकांवर काय कारवाई करायची, याबाबत शहराध्यक्ष निर्णय घेतील.’

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post