माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यातील करोना संसर्गाचा आकडा दिवसेंदिवस झापाट्याने वाढताना दिसत आहे. यामुळे जिल्ह्यात आरोग्याची स्थिती गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत उद्या (दि.14) शुक्रवारी जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासह अधिकार्यांची आढावा बैठक होणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील दालनात दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील वाढत्या करोना संसर्गावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी एकत्र बसून चर्चा करणार आहेत.
जिल्ह्यात करोना बाधितांचा एकूण आकडा 11 हजार 273 झाला असून उपचार सुरू असलेले रूग्णांची संख्या 3 हजार 408 आहे. यात सर्वाधिक नगर शहरात असून शहरातील करोनाची परिस्थिती बिकट होतांना दिसत आहे. दुसरीकडे 7 हजार 741 रुग्णांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 68.67 टक्के इतकी आहे.
करोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी काय उपायोजना करता येतील यावर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीला जिल्ह्यातील सर्व मंत्री, दोन खासदार, सर्व आमदार यांना निमंत्रित करण्यात आले असून यावेळी जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि मनपा आरोग्य विभागासह कायदा सुव्यवस्थेचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहे.
Post a Comment