आ.विखे म्हणाले,...‘यासाठी’ लागा कामाला !

माय अहमदनगर वेब टीम
श्रीरामपूर -आगामी पालिकेच्या निवडणुकीसह election सर्वच निवडणुकांच्यादृष्टीने आपण सर्वांनी कामाला लागा. तसेच आपली भूमिका स्पष्ट करून आमच्याकडे रहा, नंतर कोणालाही स्विकारणार नाही असा सज्जड इशारा देत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही लोकांना कमळ चिन्ह घेणे शक्य होणार नसेल त्यांच्यासाठी जनविकास आघाडी हा पर्याय काढणार असल्याचे सुतोवाचही केले.

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरमध्ये येऊन कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. मागील बैठकीत ठाम भूमिका घेण्याबाबत कार्यकर्त्यांना सुनावले होते. आता तुमच्याबरोबर दुपारी दुसर्‍याबरोबर आणि संध्याकाळी तिसरीकडेच अशी अवस्था असलेल्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे थांबू नये त्यांना थारा नाही असेही सुनावले होते.

परंतु काल बैठक घेताना प्रत्येक कार्यकर्त्यांबरोबर स्वतंत्रपणे बंद खोलीत प्रत्येकाची मते आजमावून घेतली होती. त्यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत कसे लढले पाहिजे, काय केले पाहिजे आणि काय भूमिका घेतली पाहिजे याबाबत चर्चा झाली. आ. विखे पाटील यांनीही प्रत्येकाची मते आजमावून घेतली. कुठे काय केले पाहिजे याबाबत स्पष्ट चर्चा झाली.

आगामी निवडणुकीत काही भागांमध्ये भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढविली जाणार आहे, मात्र ज्यांना कमळ या चिन्हावर निवडणूक लढविणे शक्य होणार नसेल तर त्यांना ‘जनविकास आघाडी’ हा पर्याय ठेवला जाणार असल्याचे सांगितले.

मागील बैठकीत जे नगरसेवक उपस्थित होते त्यापैकी पाच ते सहा नगरसेवकांनी कालच्या बैठकीला दांडी मारली. तरीही विखे यांनी काही नगरसेवकांशी फोनवर बोलून त्यांचीही मते आजमावून घेतली.

कालच्या बैठकीत माजी सभापती दीपक पटारे, नानासाहेब पवार, गिरीधर आसने, जि. प. सदस्य शरद नवले यांनी स्वतंत्रपणे भेट घेऊन चर्चा केली. नगरसेवकांमध्ये अंजूम शेख, राजेश अलघ, बाळासाहेब गांगड, शामलिंग शिंदे, मुख्तार शहा, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण, किरण लुणिया, जितेंद्र छाजेड, संतोष कांबळे, महमंद शेख, केतन खोरे, भाऊसाहेब डोळस, कलीम कुरेशी, विजय शेळके उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post