55 हजार विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण ‘लॉक’

 

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - करोनाच्या संसर्गांमुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद अन्य व्यवस्थानाच्या सर्व शाळा बंद आहेत. मात्र, सरकारने शाळांमधील शिक्षकांना ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या व शहरी भागात महानगरपालिकेच्या, तसेच इतर खासगीसह अन्य सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास घेत आहेत. परंतु ऑनलाईन शिक्षणाची कोणतीही साधने अथवा अन्य कोणताच पर्याय नसल्याने जिल्ह्यातील 55 हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण लॉक झाल्याची माहिती समोर आली आहे.

करोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून जिल्ह्यात शाळांसह सर्वकाही लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून शाळा सोडून अन्य सेक्टर सुरू करण्यात आले आहेत. मात्र, शाळा बंद असल्याने सरकारने ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या आदेशानुसार जिल्हाभर जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका आणि अन्य आस्थपनेतील सर्वच शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास घेतात का? याचा दर आठवड्याला जिल्हा परिषद आढावा घेत आहे.

गेल्या महिन्यांत जिल्हा परिषदेच्या शाळेतील 90 टक्के शिक्षक म्हणजेचे 10 हजार 338 आणि 1 लाख 32 हजार 953 विद्यार्थी म्हणजेच विद्यार्थी हे व्हॉटस गु्रप, दिशा ऑप, ऑनलाईन शिकवणी देत होते. मात्र, चालू महिन्यांच्या साप्ताहिक माहितीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील 10 हजार 336 आणि अन्य व्यवस्थापनाच्या 44 हजार 582 विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारचे शिक्षण मिळत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पहिले ते आठवीपर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणाचे पितळच उघडे पडले आहे.

116 शिक्षक अध्यापनाच्या गंधाविना

जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचे 11 हजार 413, तर इतर व्यवस्थापन शाळांचे 20 हजार 494 असे एकूण 31 हजार 907 शिक्षक आहेत. त्यापैकी केवळ 116 शिक्षक सध्या कोणतेही अध्यापक करत नाहीत. यात नगर, कर्जत, कोपरगाव आणि नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 13 शिक्षकांचा तर अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव नेवासा, शेवगाव कर्जत, पारनेर, नगर आणि मनपा हद्दीत अन्य व्यवस्थानातील 103 शिक्षकांचा समावेश आहे. उर्वरित सर्व शिक्षक ऑनलाईन, ऑफलाईन किंवा इतर मार्गाने अध्यापनाचे काम करतात, असे या अहवालातून स्पष्ट होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post