दूध दरवाढीसाठी स्वाभिमानीचा गुरुवारी मोर्चा

 

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : दुधाला दरवाढ मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारे येत्या गुरुवारी (२० ऑगस्ट) दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा नेण्यात येणार आहे व या मोर्चात जिल्हाभरातून १० हजार शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे व दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांनी दिली. लॉकडाऊन, कन्टेन्मेंट झोन व सोशल डिस्टन्सिंग नियम न पाळता हा मोर्चा औरंगाबाद रस्त्यावरील स्टेट बँक चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला जाणार आहे व त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी सहभागी होणार आहेत, असेही मोरे व लोंढे यांनी सांगितले. कोविड नियम न पाळता मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले असून, त्यावर मोरे व लोंढे यांच्यासह शरद मरकड, रविराज जाधव, शंकरराव लहारे, सतीश पवार, मंगेश असबे आदींची नावे आहेत.


राज्यातील दूध उत्पादक शेतकरी भूमिहीन शेतमजूर असून, लॉकडाऊनमुळे त्याचा रोजगार गेला आहे. १७ ते १८ रुपये इतक्या कमी दराने व उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत त्याला दूध विकावे लागत आहे. त्यामुळे दुधाला भाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारने घेतलेला १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय रद्द करावा, ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, निर्यात अनुदान प्रतिकिलो ३० रुपये दिले जावे, दूध पावडर-तूप-बटर व अन्य दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी रद्द करावे व शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ रुपये अनुदान जमा करावे, अशा मागण्य़ा मोर्चाद्वारे करण्यात येणार असल्याचे मोरे व लोंढे यांनी सांगितले. २१ जुलैला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूर दरवाढीसाठी लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी आमचे म्हणणे ऐकून मार्ग काढण्याची ग्वाही दिली होती, पण महिनाभरात काहीच झाले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चाचा निर्णय घेतल्याचे मोरे यांनी सांगितले.


भाजपचे आंदोलन राजकीय हेतूने

दूध प्रश्नावरून भाजप सध्या आंदोलन करीत असले तरी त्यांचे हे आंदोलन राजकीय हेतूने आहे, अशी टीका मोरे यांनी केली. भाजपचे आंदोलन म्हणजे खोटारडेपणाच आहे. ते फक्त राजकीय विषय घेऊन आंदोलन करीत आहेत. त्यांनी केलेले आंदोलन फक्त स्टंट आहे, असा आरोपही त्यांनी केला. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते सुद्धा नौटंकी करीत आहेत, वास्तविक पाहता शेतकऱ्यांचे अनेक पैसे त्यांनी थकवले आहेत. शेतकऱ्यांचा संप मोडकळीत काढण्यात त्यांचा मोठा वाटा होता, असा गंभीर आरोपही मोरे यांनी यावेळी केला. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकारद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आमदारकीची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्याविरोधात आंदोलन कसे, असे मोरे यांना विचारले असता, मागील भाजप सरकारच्या काळातही आम्ही त्यांच्या समवेत होतो व शेतकरी विरोधात निर्णय घेतले जात असल्याने बाहेर पडलो होतो, त्यामुळेही आताही आमदारकी पेक्षा आम्हाला शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे आहे व दूध दरवाढीसाठी आम्ही आक्रमक आंदोलन करणार आहोत, आमचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालीच हा मोर्चा काढणार आहोत, असेही मोरे यांनी स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post