मंत्रालयात का जात नाही ? मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - 'मंत्रालयात जात नसल्याच्या माझ्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये मुळात दम नाही. घरी बसून तंत्रज्ञानाच्या मदतीनं मी महाराष्ट्रात पोहोचत असेन. निर्णय घेत असेल तर मंत्रालयात जाण्याचा हट्ट का? तंत्रज्ञान इतकं प्रगत असताना त्याचा उपयोग करायचा नसेल तर त्याचा फायदाच काय,' असा प्रतिप्रश्न करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना खणखणीत उत्तर दिलं. 

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिलेली ही पहिली प्रदीर्घ मुलाखत आहे. खासदार संजय राऊत यांनी गेले काही दिवस केलेल्या ट्वीटमुळं मुलाखतीची उत्सुकता वाढली होती. अपेक्षेप्रमाणे उद्धव यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तर दिली आहेत. सरकारवर होणाऱ्या आरोपांवरही ते बोलले.

मागील सहा महिन्यांच्या काळात उद्धव ठाकरे हे क्वचितच मंत्रालयात गेले आहेत. 'मातोश्री' निवासस्थानी बसूनच ते सरकार चालवत असतात. इतकंच नव्हे, महाविकास आघाडीचे अनेक मंत्री व नेतेही त्यांच्याशी चर्चेसाठी 'मातोश्री'वर जाताना दिसतात. त्यामुळं विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर सातत्यानं टीका होत असते. विरोधकांच्या या टीकेला उद्धव यांनी आज प्रथमच उत्तर दिलं. 

ते म्हणाले, 'सध्या लॉकडाऊनुळं मंत्रालय आता बंद आहे. आता तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की त्याचा उपयोग तुम्ही करत नसाल तर ते तुमचं दुर्भाग्य आहे. मी मंत्रालयात कमीत कमी जात असलो तरी माझं काम थांबलेलं नाही. घरात राहून मी सातत्यानं सरकारच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घेत असतो. महाराष्ट्राच्या विविध भागांतील तिन्ही पक्षांच्या आमदरांच्या बैठका घेतो. घरात बसून सर्वत्र पोहोचतो. एका वेळेला संपूर्ण राज्य कव्हर करतो आणि मुख्य म्हणजे निर्णय घेतो. त्यामुळं या आरोपामध्ये काही दम नाही.'

'सरकारचा प्रमुख म्हणून मी फिरणं आवश्यक आहे, हे अमान्य करत नाही. पण व्हिडिओ कॉन्फरन्सचा माध्यमातून मी एकाच वेळी सर्व ठिकाणी जातो. त्यातून प्रवासाचा वेळ वाचतो. सध्याच्या काळात हे अधिक उपयुक्त आहे आणि तंत्रज्ञानाचा उपयोग आपण करणारच नसू तर ते शोध कशाला लावायचे?,' असा प्रश्नही त्यांनी केला.

घरातून अधिकाऱ्यांशी संवाद होऊ शकतो, पण जनतेचं काय, असं विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले.. 'सध्या लॉकडाऊन आहे. सभा-समारंभ बंद आहेत. अशा वेळी जनतेत मिसळणं म्हणजे आपला नियम आपणच तोडण्यासारखं आहे. दोन माणसांमध्ये अंतर ठेवता येतं. पण मोठ्या संख्येनं लोक आले तर ते शक्य होत नाही. नियमाचं पालन मी नाही केलं तर जनता का करेल?,' अशी विचारणाही त्यांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post