रशियात १२ ऑगस्टपासून कोरोना लसीकरण
माय अहमदनगर वेब टीम
मॉस्को - कोरोना प्रतिबंधक लस संशोधन आणि उत्पादनाच्या बाबतीत रशिया अन्य देशांच्या तुलनेत दोन पावले पुढे आहे. जगातील पहिली कोरोना व्हॅक्सिन ऑगस्ट महिन्यात बाजारात येईल, असा दावा रशियाने केला होता. त्यानुसार येत्या 12 ऑगस्टपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार असल्याची घोषणा रशियाने केली आहे. कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिनची मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा या देशाने यापूर्वीच केला आहे.
रशियामध्ये यंदा देशांतर्गत वापरासाठी प्रायोगिक तत्वावर कोरोना विषाणू प्रतिबंधक व्हॅक्सिनचे 3 कोटी डोस उत्पादित करण्याची योजना रशियाने आखली आहे. पैकी एक कोटी 70 लाख डोस अन्य देशांतून उत्पादित करवून घेतले जातील. गॅमॅलेई नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमिलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचे संचालक अॅलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी सांगितले, “12 ते 14 ऑगस्टदरम्यान कोरोना व्हॅक्सिनचे डोस लोकांना देण्यास सुरुवात होईल. खासगी कंपन्यांकडून सप्टेंबरपासून व्हॅक्सिनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झालेली असेल.” रशियातील आघाडीचे दैनिक ‘मॉस्को टाईम्स’नेही हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले आहे. मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीने क्लिनिकल ट्रायल पूर्ण केले आहे. मानवी चाचणीअंतर्गत स्वयंसेवकांच्या पहिल्या चमूला 15 , तर दुसर्या चमूला 20 जुलै रोजी घरी जाण्यास परवानगी देण्यात येईल. 18 जूनपासून लसीच्या चाचणीला सुरुवात झालेली आहे. लसीची पहिली मानवी चाचणी 38 लोकांवर एक महिना चालली.
ऑक्सफर्डची चाचणीही यशस्वी
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या व्हॅक्सिनची मानवी चाचणीही यशस्वी ठरली आहे. ऑक्सफर्डची ही व्हॅक्सिन कोरोनापासून दुहेरी संरक्षण करण्यात सक्षम असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. भारतीय युवक दीपक पालीवाल हा चाचणीत स्वयंसेवक म्हणून सहभागी होता, हे येथे उल्लेखनीय.
भारतासह जगभरात 155 प्रयोग
कोरोनावर व्हॅक्सिन व औषध बनविण्याचे जगभरात 155 प्रयोग चाललेले आहेत. पैकी 23 प्रकल्प मानवी चाचणीच्या टप्प्यातून जात आहेत. अमेरिका, ब्रिटन, भारत, चीन आणि ऑस्ट्रेलियातही व्हॅक्सिनच्या मानवी चाचणीचे टप्पे सुरू आहेत. भारतात भारत बायोटेक तसेच झायडस कॅडिला या औषध कंपन्यांकडून मानवी चाचण्या सुरू आहेत.
Post a Comment