राज्यमंत्री तनपुरे, आ. संग्राम जगताप यांच्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांनी प्रशासनाचे उपटले कान


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - ज्याज्या ठिकाणी करोना उपचार आणि तपासणी सेंटर सुरू केले आहेत. त्याठिकाणी अस्वच्छतेचेे साम्राज्य आहे. तेथे रुग्णांना सुविधा नाहीत, जेवण व्यवस्थित मिळत नाही, ही वस्तूस्थिती आहे. यासह नगर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे आणि नगरचे आ. संग्राम जगताप यांनी तक्रार केली आहे.

यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक घेऊन करोना सेंटरमध्ये स्वच्छता राखा, औषधे नसतील तर लगेच कळवा, करोना रुग्णांना दर्जेदार जेवण द्या, त्यांना राम भरोसे ठेवू नका, या शब्दांत प्रशासनाचे कान उपटले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी सकाळी जिल्ह्यातील करोनाच्या स्थितीबाबत पालकमंत्री आ. हसन मुश्रीफ आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यबैठक घेतली. या बैठकीत संगमनेरहून महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. सुधीर तांबे, जिल्हाधिकारी कार्यालयातून राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे, आ. बबनराव पाचपुते, आ. संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलसी अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, कोपरगावमधून आ. आशुतोष काळे, श्रीरामपूरमधून खा. सदाशिव लोखंडे हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले.

सुरूवातीला जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जिल्ह्यातील करोनाचा स्थितीचा आढावा दिला. यात जिल्ह्यात करोनावर उपचार घेणार्‍यांची संख्या 600 च्या आत आहे. नगर संगमनेर वगळता अन्य ठिकाणी ऑक्टिव्ह केसेसची संख्या 50 च्या आत आहे. जिल्ह्यातील एकूण अ‍ॅक्टिव्ह केसेसपैकी निम्मे रुग्ण हे नगर आणि संगमनेरमध्ये आहेत. जिल्ह्यात करोना तपासणीचा वेग वाढविण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांत 900 हून अधिक तपासण्या करण्यात आल्या आहेत. एक आठवड्यात जिल्हा रुग्णालयातून दररोज एक हजार तपासण्या करण्यात येणार आहेत. नगर शहरात बाधित येणार्‍यांची संख्या अधिक असली तरी संगमनेरप्रमाणे गंभीर रुग्ण नगरमध्ये आढळत नाहीत. त्याप्रमाणे करोनावर मात करणार्‍यांची दैनदिन संख्या मोठी आहे. यासह नगरमधील करोना रुग्णांसाठी असणारे बेड्स, हॉस्पिटल आदींची सविस्तर माहिती दिली.

त्यानंतर सर्वप्रथम खा. लोखंडे बोलले यात जास्तीजास्त पीपीई किटस् उपलब्ध करून द्याव्यात, तालुकास्तरावरील करोना निधी संपला असून तो मिळावा आदी मागण्या त्यांनी केल्या. आ. पाचपुते यांनी जिल्हा प्रशासनाच्या उत्तम नियोजनाचे कौतुक केले. मात्र, लग्न समारंभ आणि अन्य ठिकाणी नागरिक गर्दी करत आहेत. यामुळे करोनाचा धोका वाढत असून गर्दी करणार्‍यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आ. संग्राम जगताप यांनी नगर शहरातील वाढता संसर्ग पाहता तातडीने तपासण्या व्हाव्यात, करोना तपासणीसाठी स्त्राव घेतल्यानंतर ठेवण्यात येणार्‍या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असुविधा आहेत. त्याठिकाणी माणूस राहूच शकत नाही, एवढी अस्वच्छता आहे. जेवणाची सोय नाही, राहण्याची सुविधा नाहीत आदी तक्रारी केल्या. यासह महापालिकेत करोनाच्या नावाखाली कामेच बंद झाली आहेत. त्याचा परिणाम शहराच्या कामकाजावर झाला असल्याची तक्रार केली. आ. काळे यांनी देखील करोना चाचणीचे अहवाल उशीरा येत असल्याची व्यथा मांडली.

महसूलमंत्री आ. थोरात यांनी अन्य जिल्ह्याच्या तुलनेत नगरची स्थिती चागली आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यासंदर्भात काहींचे म्हणणे करा तर काहींचे म्हणणे करू नका असे आहे. आता लॉकडाऊनचा उपयोग होईल का हे सांगत येत नाही. एका व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंब बाधित होत असल्याने लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जावू नये, आपल्यामुळे आपले कुटुंब अडचणीत येत असल्याबाबत जनजागृती करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.

तसेच संगमनेरला करोना औषधाचा पुरवठा होत नसल्याची तक्रार केली. त्यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले. तसेच औषधे नसतील तर टेंडर करा, उपचारासाठी औषधे कमी पडणार नाही, याची काळजी घ्या, गरज वाटल्यास आरोग्य मंत्र्यांशी मी बोलतो, असे सांगितले.

राज्यमंत्री आ. तनपुरे यांनी आ. जगताप यांच्या तक्रारीचा धागा पकडून करोना रुग्णांना क्वारंटाईन करून ठेवण्यात येणार्‍या ठिकाणी सुविधा नाही, त्या ठिकाणी रुग्णाला पाठविल्यानंतर तुमची रूम तुम्हीच शोधा, अशा तक्रारी येत आहेत. त्यावर पालकमंत्र्यांनी चिडून ज्याज्या ठिकाणी करोना उपचार आणि तपासणी सेंटर सुरू केले आहेत. त्याठिकाणी अस्वच्छतेचेे साम्राज्य आहे. तेथे रुग्णांना सुविधा नाहीत, जेवण व्यवस्थित मिळत नाही, ही वस्तूस्थिती आहे. जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक घेऊन करोना सेंटरमध्ये स्वच्छता राखा, औषधे नसतील तर लगेच कळवा, करोना रुग्णांना दर्जेदार द्या, त्यांना राम भरोसे ठेवू नका, या शब्दांत प्रशासनाचे कान उपटले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ हे चांगले व्यक्ती आणि मंत्री आहेत. मात्र, मुदत संपणार्‍या सरपंचाच्या जागेवर प्रशासक नियुक्तीच्या विषयावरून गावागावांत सौदेबाजी सुरू झाली आहे. यात विनाकरण मुश्रीफ यांच्यावर शिंतोडे उडण्याची शक्यता आहे. पालकमंत्री यांच्यावर आजपर्यंत एकही आरोप झालेला नाही, यामुळे या प्रकरणात काळजी घेण्याचे आवाहन पाचपुते यांनी बैठकीत केले. यावेळी पाचपुते आणि खा. लोखंडे यांनी खतांच्या टंचाईबाबत गंभीरपणे तक्रारही केली.


बैठकीदरम्यान आ. संग्राम जगताप तक्रार करत असताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी नगर शहर लॉकडाऊन कराचे का असा प्रश्न आ.जगताप यांना केला. त्यावर जगताप यांनी नगर शहर नाही तर संपूर्ण जिल्हा 25 दिवसांसाठी लॉकडाऊन करा, तालुक्याच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात येत आहेत, असे सांगितले

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post