सीमा करणार नाही पार, खाली जाणार नाही वार!



माय अहमदनगर वेब टीम
अंबालामधील राफेलच्या तैनातीनंतर चीनला लागून असलेल्या लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी) आणि पाकिस्तानला लागून असलेल्या लाईन ऑफ कंट्रोलवरील (एलओसी) भारताची संरक्षण यंत्रणा कमालीची मजबूत होणार आहे. तूर्त अंबालातील तैनातीनंतर 7 दिवसांतच राफेल विमान ‘एलएसी’वर तैनात केले जाणार आहे. ‘एलएसी’सह ‘एलओसी’वरही राफेल टेहळणी करणार आहे. शत्रुराष्ट्रांशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला आहे. 

भारतीय हवाई दलाने यापूर्वी राफेलचे स्क्वॉड्रन राजस्थानातील जोधपूर हवाई तळावर तैनात करण्याचे ठरविले होते. जोधपुरात त्या द़ृष्टीने तयारीही सुरू करण्यात आली होती; पण जसजसे पाकिस्तानसोबत चीनशीही संबंध बिघडत गेले तसतसे राफेल स्क्वॉड्रन जोधपुरातून हलवून अंबालात उतरविण्याचे ठरले. अंबालापासून ‘एलएसी’ आणि ‘एलओसी’ दोन्ही जवळ पडतात. चीन आणि पाकिस्तान दोन्ही आघाड्यांवर येथून मारा करता येणे शक्य आहे. या हिशेबानेच अंबालाची निवड झाली. 

सीमेवरूनच सीमापार विध्वंस

राफेल एअरक्राफ्ट सीमा पार न करताही शत्रूचे तळ उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेला हवाई लढवय्या आहे. हवाई सीमा पार न करता राफेल पाकिस्तान आणि चीनमध्ये 600 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. अंबालाहून अवघ्या 45 मिनिटांत ते ‘एलएसी’ तसेच ‘एलएसी’वर धडकू शकते आणि तेथून लक्ष्य निश्चित करून मारा करू शकते. प्रसंग उद्भवल्यास राफेलच्या माध्यमातून पाकिस्तान आणि चीनमध्ये विध्वंस करण्याची सगळी व्यवस्था भारतीय हवाई दलाने करून ठेवलेली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post