देशातील कोरोना मृत्यूंची संख्या ३४ हजार पार





माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने साडे पंधरा लाखांचा टप्पा ओलांडला असला तरी कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. देशातील कोरोना मुक्तीचा दर ६४ टक्क्यांहून अधिक झाला आहे. पंरतु, चिंताजनक बाब म्हणजे ​कोरोना मृत्यूच्या संख्या ३४ हजारांहून अधिक झाली आहे. विविध राज्यांना मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रबळ उपाययोजना आखण्याचे निर्देश केंद्रित आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. देशातील पाच राज्यांमध्येच ६० टक्क्यांहून जास्त म्हणजे २४ हजारांहून अधिक कोरोनामृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळपर्यंत देशात ४८ हजार ५१३ नवीन रुग्णांची भर पडली. तर, ७६८ रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी देशातील विविध रुग्णालयातून ३५ हजार २८६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील कोरोना मुक्तीचा दर त्यामुळे ६४.५१ % नोंदवण्यात आला आहे. कोरोना बाधितांची एकूण संख्या त्यामुळे १५ लाख ३१ हजार ६६९ एवढी झाली आहे. यातील ९ लाख ८८ हजार २९ रुग्णांनी कोरोनावर मात​ मिळवली आहे. तर, ५ लाख ९ हजार ४४७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनामुक्त आतापर्यंत ३४ हजार १९३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 


 
सर्वाधिक कोरोना प्रभावित महाराष्ट्रात गेल्या एका दिवसांत ७ हजार ७१७ हजार कोरोनाबाधितांची भर पडली. महाराष्ट्रा पाठोपाठ आंधप्रदेश (७,९४८), तामिळनाडू (६,९७२), कर्नाटक (५,५३६), उत्तर प्रदेश (३,४५८), बिहार (२,५९९) तसेच पश्चिम बंगाल मध्ये (२,१३४) मोठ्या संख्येत कोरोनारुग्ण आढळून आले. या राज्यांपाठोपाठ राज्यस्थान (१,६३६) , तेलंगणा (१,६१०), आसाम (१,३७१), ओडिशा (१,२१५), केरळ (१,१६७), गुजरात (१,१०८) तसेच हरियाणात (७४९) कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. 

गेल्या एका दिवसात सर्वाधिक कोरोना मृत्यूची नोंद महाराष्ट्रात घेण्यात आली आहे. राज्यात मंगळवारी २८२ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रासह कर्नाटकात १०२, तामिळनाडूत ८८, राजधानी दिल्लीत २८, गुजरात २४, मध्यप्रदेश १०, तेलंगणात ९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. देशातील कोरोना मृत्यूचा दर २.२५% नोंदवण्यात आला आहे. 

देशात आतापर्यंत १ कोटी ७७ लाख ४३ हजार ७४० नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ८ हजार ८५५ कोरोना चाचण्या या मंगळवारी करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) कडून देण्यात आली आहे. 

दिल्लीतील तुरुंगात २२१ कोरोना बाधित 

राजधानी दिल्लीतील तुरुंगांमध्ये कोरोना बाधितांची संख्या २२१ एवढी झाली आहे. यातील ६० पैकी ५५ कोरोना बाधित कैदी कोरोनामुक्त झाले आहेत. दोन कैद्यांचा मृत्यू झाला, तर एका कैद्याला सोडण्यात आले असून तो घरगुती विलगीकरणात असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. तुरुंगातील कोरोनाबाधित १६१ कर्मचाऱ्यांपैकी १२२ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. ३९ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तुरुंगाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 
 
सर्वाधिक कोरोनाप्रभावित राज्यातील स्थिती 

राज्य         कोरोना मुक्त   कोरोना मृत्यू 

१) महाराष्ट्र        २,३२,२७७    १४,१६५ 

२) तामिळनाडू  १,६६,९५६     ३,६५९

३) दिल्ली          १,१७,५०७     ३,८८१

४) आंधप्रदेश     ५२,६२२       १,१४८

५) कर्नाटक      ४०,५०४        २,०५५ 
............................................................................
एकूण-            ६,०९,८६६     २४,९०५ 

देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी (बुधवारी सकाळी ८ वाजतापर्यंत) 

एकूण कोरोना बाधित - १५ लाख ३१ हजार ६६९

कोरोनामुक्त- ९ लाख ८८ हजार २९

सक्रिय रुग्ण- ५ लाख ९ हजार ४४७ 

कोरोना मृत्यू-  ३४ हजार १९३

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post