नगर तालुक्यातील १७ गावे कंन्टेन्मेंट झोन घोषीत ;१०७ बाधित रुग्णांवर उपचार सुरु



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नगर शहरापाठोपाठ आता शहराजवळील गावांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे शहरालगतच्या १७ गावांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार उमेश पाटील यांनी कंन्टेन्मेंट झोन घोषीत केले आहेत. यातील अनेक गावांनी गावात येणारे सर्व रस्ते पत्रे व बांबू लावून बंद केले आहेत.

नगर तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १३६ झाली असून त्यातील १०७ रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आलेले आहेत. १९ रुग्ण आत्तापर्यंत उपचार घेवून घरी परतले असून २ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवडा भरापासून या गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. बुधवारी (दि.२२) सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब तसेच खाजगी लॅबमधील अहवालानुसार २४ जण बाधित आढळले आहेत. त्यामध्ये बुऱ्हाणनगर १६, नागरदेवळे १, टाकळी खातगाव ४, सारोळा कासार ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.बुऱ्हाणनगर येथे कोरोना रुग्णांची संख्या ३० झाली आहे . कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी गाव लॉक डाऊन करण्यात आले आहेत. गावच्या सर्व सीमा पत्रे ठोकून बंद करण्यात आल्या आहेत. सारोळा कासार मध्ये बाधितांची संख्या ४ झाली आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना आरोग्य तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात तसेच काहींना खाजगी लॅब मध्ये   पाठवले जात आहे. कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने गावातील सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. गाव संपुर्ण बंद ठेवण्यात आले आहे.

शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे . बाधीत गावांच्या शेजारील अनेक गावांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतःहून जनता कर्फ्यू  पुकारला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बाधीत गावात आरोग्याच्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे.

कंन्टेन्मेंट झोन घोषित केलेली गावे

नगर तालुक्यात कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी घोसपुरी, गुंडेगाव, देऊळगाव सिध्दी, चास, सोनेवाडी, अकोळनेर, सारोळा कासार, नागरदेवळे, नवनागापुर, विळद, वडारवाडी, बुऱ्हाणनगर,पोखर्डी, निमगाव घाणा, टाकळी खातगाव, बाबुर्डी बेंद,रुई छत्तीशी आदी गावे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार उमेश पाटील यांनी कंन्टेन्मेंट झोन घोषीत केले आहेत. या गावात अत्यावश्यक सेवा, तातडीची वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा समित्या सतर्क झाल्या आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्योती मांडगे-गाडे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post