जिल्हयात सुरु झाल्या अँटीजेन चाचण्या
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या तातडीच्या निदानासाठी आरोग्य यंत्रणेने अँटीजेन चाचण्या सुरु केल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या या जलदगती कार्यवाहीने रुग्ण निदानाचा वेग वाढला असून चार दिवसात 1 हजार 95 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात 158 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तातडीने निदान झाल्यामुळे बाधितांवर उपचारही सुरु झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. नगर जिल्ह्यात सोमवारी (दि.20) दिवसभरात विक्रमी 341 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये 10 रुग्ण बाधित आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि पोर्टलवर नोंद झालेल्या 173 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील निकट सहवासितांची जलद गतीने तपासणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात अँटीजेन चाचण्यांना गेल्या 3-4 दिवसापासून सुरुवात केली आहे. आतापर्यंत 1095 चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात 158 जण बाधित आढळले आहेत. त्याचीही नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 854 इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या 2027 इतकी झाली आहे.
5 तालुक्यांसह नगर व भिंगारमध्ये अँटीजेन किटचे वितरण
बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेचा वेग वाढावा यासाठी तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणेला अँटीजेन किटचे वितरण करण्यात आले आहे. त्या माध्यमातून बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अशा चाचण्यांच्या माध्यमातून बाधित आढळलेल्या 158 रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, कोपरगाव, संगमनेर, भिंगार कॅन्टोन्मेंट आणि नगर महानगरपालिका आरोग्य यंत्रणेला या अँटीजेन कीटचे वितरण करण्यात आले आहे.
गेल्या तीन-चार दिवसात केलेल्या चाचण्यांचा एकत्रित अहवाल सोमवारी (दि.20) जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे येऊन त्यात बाधित आढळलेल्या रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या 173 रुग्णांची नोंद ही एकूण रुग्ण संख्येत करण्यात आली आहे. एकूण रुग्ण संख्या 2027 झाली असून त्यातील 1133 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. उपचार सुरू असलेले रुग्ण 854 असून 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाडे यांनी दिली.
शहरातील 15 जणांसह जिल्ह्यात 100 रुग्णांनी ’कोरोना’वर मात
शहरातील 15 जणांसह नगर जिल्ह्यात आज मंगळवारी (दि.21) दुपारी 100 रुग्णांनी ’कोरोना’वर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना मुक्त झालेल्यांमध्ये नगर ग्रामीण 2, नगर शहर 15, नेवासा 6, पारनेर 7, राहाता 1, पाथर्डी 10, भिंगार कॅन्टोन्मेंट 14, राहुरी 4, संगमनेर 26, श्रीगोंदा 2, अकोले 2, कर्जत 2 आणि कोपरगाव येथील 9 रुग्ण बरे झाले, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 1233 झाली आहे.
Post a Comment