लग्नाचा खर्च मर्यादित; सोन्यातील गुंतवणूक वाढलीमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - शासनाने लग्नसमारंभामध्ये फक्त 50 लोकांची मर्यादा घातल्याने लग्नसराईचे गणितच बदलले आहे. लग्न समारंभातील हॉलच्या सजावटीपासून हजारो लोकांचे जेवण, मेहंदी, संगीत अशा विविध कार्यक्रमांचा खर्च कमी झाला आहे. परिणामी, या खर्चातील बचतीचे रुपांतर आता सोन्यामधील गुंतवणुकीच्या रूपात समोर येऊ लागले आहे.

मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले की, लॉकडाऊन काळात दागिन्यांची बुकिंग केलेले ग्राहक ऑर्डर स्वीकारण्यासाठी येऊ लागले आहेत. मात्र लॉकडाऊनआधी दिलेल्या ऑर्डरमध्ये ग्राहकांकडून वाढ करण्यात येत आहे. लग्नसमारंभात वाचणारा खर्च स्त्री-धन रूपात गुंतवणूक म्हणून करत असल्याची माहिती ग्राहकांकडून मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे याघडीला झवेरी बाजारातील बहुतांश कारागीर गावाकडे गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांसमोर आवडीचे दागिने तयार करण्याचे अधिक पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे अधिकतर ग्राहकांना रेडीमेड दागिन्यांची खऱेदी करण्याचा सल्ला सराफा देत आहेत.

लॉकडाऊनचा फटका इतर क्षेत्रांप्रमाणेच सराफा बाजारालाही बसला आहे. सम-विषम पद्धतीने झवेरी बाजार खुला राहत असल्याने ग्राहकांसह सराफांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ग्राहक बाजारात आल्यानंतर दुकान बंद असल्याचे कळताच रिकाम्या हाताने परतत आहेत. त्यामुळे सरकारने सलग सहा दिवस दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी सराफांमधून केली जात आहे.

ऑक्टोबरनंतर येणार अच्छे दिन

सराफा संघटनांच्या म्हणण्यानुसार, तूर्तास अनेक लग्नसमारंभ पुढे ढकलले जात असून 15 जुलैनंतर लग्न सराईचे मुहूर्त नाहीत. त्यामुळे थेट ऑक्टोबर महिन्यात लग्न समारंभांना सुरुवात होईल. त्यावेळी मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता सराफांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनमधील अनेक निर्बंध कायम असल्याने झवेरी बाजारात 20 ते 25 टक्केच उलाढाल सुरू असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

सोन्याचे दर आणखी वाढणार

कोरोनाचा फटका जागतिक पातळीवर सोन्याच्या उत्पादनावरही झाला आहे. सोन्याच्या खाणींमधील अनेक कामगार कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. याउलट जागतिक स्तरावर असलेल्या आर्थिक मंदीमुळे गुंतवणूकदारांचा मोर्चा अद्याप सोन्याच्या दिशेने दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात 50 हजार रुपये प्रतितोळा असलेले सोने येत्या दसरा ते दिवाळीपर्यंत प्रतितोळा 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे.

म्हणूनच सोन्यामधील गुंतवणूक वाढतेय

आर्थिक मंदीमुळे सुरक्षित गुंतवणूक आणि झटपट रोख रक्कम उपलब्ध करून देणारा पर्याय म्हणून सोन्याला पसंती मिळत आहे.  उच्चभ्रू वर्गात लग्न समारंभांमध्ये मेहंदी, हळद, संगीत या इतर कार्यक्रमांवर लाखो रुपयांचा खर्च व्हायचा. याशिवाय प्रत्यक्ष लग्नासाठी हॉल, तेथील सजावट, हजारो अतिथींचे जेवण आणि इतर खर्च पकडता लग्नाचा एकूण खर्च कोट्यवधींमध्ये पोहोचत होता.

शासनाने लग्नसमारंभावर आणलेल्या निर्बंधांमुळे जेमतेम खर्चात लग्नसोहळे पार पडत आहेत. त्यातून वाचलेला पैसा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवला जात असल्याचे निदर्शनास येते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post