जून महिन्यात तब्बल सव्वा कोटी युनिट वीज निर्मिती



माय अहमदनगर वेब टीम
भंडारदरा - उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाण्यावर शेती फुुलली, कारखानदारी वाढली. त्याचबरोबर आता येथील वीज निर्मिती केंद्रातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होत आहे. यंदा एकट्या जून महिन्यात विद्युत गृह क्रमांक 1 मधून तब्बल 75 लाख 16 हजार 600 युनिट तर विद्युत गृह क्रमांक 2 मधून 52 लाख 32 हजार असे एकूण 1 कोटी 27 लाख 48 हजार 800 निव्वळ युनिट निर्मिती झाली. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. दरवर्षी धरणात पाणी नसल्याने वीज निर्मिती बंद असते. पण याला यंदाचे वर्ष अपवाद ठरले आहे.

भंडारदरा धरण म्हणजे उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी. प्रवरा नदीच्या पाण्याचा ज्या ज्या गावांना स्पर्श झाला. तेथील शेती फुलली. कारखानदारी बहरली. यातून अनेक गावांना सुबत्ता प्राप्त झाली. अनेकांचे संसार फुलले. ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलले. येथील राजकारणही पाण्यावर फुलू लागले. याच प्रश्नावरून अनेक निवडणुकाही गाजल्या. आता याच पाण्यावर स्वस्तात वीज निर्मिती होऊ लागली आहे.

पाणलोटात गतवर्षी धो-धो पाऊस झाला. त्यामुळे भंडारदरा धरण दोनदा ओव्हरफ्लो झाले. यंदाही मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे जूनमध्ये शेती आवर्तन, पिण्याचे आवर्तन, बंधारे भरले तसेच भंडारदरातून पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे याच पाण्यावर वीजनिर्मिती सुरू होती. येथील वीज केंद्र 7 मार्च रोजी सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आले होते. ते 1 जुलैैला बंद करण्यात आले. एकट्या जून महिन्यात विद्युत क्रमांक 1 मधून सलग 1 जून ते 30 जून अखेर 75 लाख 16 हजार 600 युनिट निर्मिती झाली आहे. विद्युत गृह क्रमांक 2 मधून 52 लाख 32 हजार असे एकूण 1 कोटी 27 लाख 48 हजार 800 निव्वळ युनिट निर्मिती झाली. हा प्रकल्प सुरू झाल्यापासून हा प्रथमच विक्रम आहे.

विद्युत गृह क्रमांक 1 मधून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत 3 कोटी 40 लाख 69 हजार 200 युनिट. 1 जून 2019 ते 31 मे 2020 5 कोटी 21 लाख 25 हजार 600 युनिट. तर विद्युत गृह क्रमांक 2 मधून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत 1 कोटी 34 लाख 71 हजार 200 युनिट.आणि विद्युत गृह क्रमांक 2 मधून 1 जून 2019 ते 31 मे 2020 या कालावधीत 2 कोटी 48 लाख 78 हजार 400 युनिट वीज निर्मिती झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post