तब्बल १८ वर्षात पहिल्यांदाच आयातीच्या तुलनेत निर्यात जास्त!

माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - जून महिन्यातील आयात-निर्यातीचे आकडे केंद्र सरकारने जाहीर केले असून १८ वर्षात पहिल्यांदाच आयातीच्या तुलनेत निर्यात जास्त झाली आहे. जून महिन्यात ट्रेड सरप्लस ०.७९ अब्ज डॉलर्स इतका नोंदवला गेला आहे.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जूनमध्ये एकूण आयात ४७.५९ टक्क्याने घटून २१.११ अब्ज डॉलर्सची झाली तर निर्यात १२.४१ टक्क्याने कमी होऊन २१.९१ अब्ज डॉलर्स इतकी झाली. पेट्रोलियम पदार्थ, टेक्सटाइल, इंजीनियरिंग गुड्स व रत्न- आभूषणांची निर्यात जूनमध्ये कमी झाली. कोरोना संक्रमणामुळे सलग चौथ्या महिन्यात निर्यातीवर परिणाम झाला आहे. गतवर्षीच्या जूनमध्ये व्यापार तूट १५. २८  अब्ज डॉलर्स इतकी होती.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत निर्यात ३६.७१  टक्क्याने कमी होऊन ५१.३२ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. तर आयात ५२.४३ टक्क्याने कमी होऊन ६०.४४ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. तिमाहीतील व्यापार तूट ९.१२ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. सीमा रेषेवर चीनने केलेली दगाबाजी आणि कोरोनाचे संक्रमण या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचा संदेश देशवासियांना दिला आहे. त्यानुसार आयातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post