कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - विद्युत विभागामध्येच 10 वायरमन, 9 मानधनावरील कर्मचारी असून संपूर्ण शहराचे लाईट चालू बंद करण्याचे काम मानधनावरील कर्मचारी करतात. शहर व उपनगरामध्ये बर्‍याच ठिकाणी सायंकाळी लवकर लाईट चालू करण्यात येते व सकाळी उशिरापर्यंत चालू राहते. याबाबत संबंधीत कर्मचारी यांना वेळेवर लाईट चालू बंद करण्याबाबत सुचना दिल्यात. यामध्येच कामात हलगर्जीपणा झाल्यास सदर मानधनावरील कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकून नव्याने कर्मचारी नेमण्यात येतील, असा इशारा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला आहे.

विद्युत विभागात प्रमुख म्हणून आर. जी. मेहेत्रे यांची नियुक्ती झाली. या विभागाची कामकाज आढावा बैठक म हापौर बाबासाहेब वाकळे यांनी घेतली यावेळी विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, नगरसेवक विनीत पाऊलबुधे, सुनिल त्रिंबके, कुमार वाकळे, उपायुक्त प्रदिप पठारे, विद्युत विभाग प्रमुख आर.जी. मेहेत्रे, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, संजय ढोणे, सतिष शिंदे, निखील वारे, बाळासाहेब पवार, मनोज ताठे, सुरज शेळके आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, पावसाळ्याचे दिवस असल्याने कर्मचारी यांनी जबाबदारीने काम करावे. शहर उपनगरातील लाईट चालू राहतील याबाबत दक्षता घ्यावी. श्री. क्षेत्रे यांनी सदस्यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे काम करावे. विद्युत विभागाकडील कर्मचार्‍यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे मनपाचे नुकसान होत असेल तर संबंधित कर्मचार्‍यांच्या पगारातून झालेले नुकसान वसुल करण्यात येईल त्यामुळे कर्मचार्‍यांनी जबाबदारीने काम करावे. विद्युत विभाग प्रमुख यांनी चार झोनसाठी चार पर्यवेक्षकांची नेमणुक करावी. त्यांना मानधनावर नियुक्त असलेले अभियंता श्री. तिवारी व शिवप्रकाश हे कामात सहाय्य करतील तसेच मनपाचे विद्युत विभागाशी निगडीत असलेले प्रकल्प तातडीने मार्गी लागण्याच्या दृष्टीने संबंधीत अभियंता यांचेकडे काम सोपविण्यात यावे.

विद्युत विभागाकडील हायड्रोलिकच्या तीन वाहनापैकी एक वाहन नादुरूस्त आहे ते तातडीने दुरूस्त करून घ्यावे तसेच या वाहनावर दोन वाहन चालकांची आवश्यकता असून मानधनावर वाहनचालकांची नियुक्ती करावी. विद्युत विभागास आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग देण्यामबाबत आस्थापना विभागास आदेश दिले. विद्युत विभाग प्रमुख आर. जी. मेहेत्रे म्हणाले की, शहर व उपनगरातील इलेक्ट्रीक पोलचा सर्व्हेकरून प्रत्येक पोलवर नंबर टाकण्यात येईल त्यामुळे किती पोलची संख्या आहे ते कळेल व कोणत्या पोलवरील दिवा बंद आहे ते तात्काळ लक्षात येईल. विद्युत विभागातील कर्मचार्‍यांना कामाचे नियोजन करून लाईट वेळेत चालू व बंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत. जे कर्मचारी काम करणार नाहीत त्यांचा रिपोर्ट आस्थापना विभागाकडे पाठविला जाईल असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post