कांदा निर्यात घटल्याने परकीय चलन घटले



माय अहमदनगर वेब टीम
लासलगाव -  एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत ०९.९५ लाख मेट्रीक टन कांदा निर्यात होऊन देशाला १९५३ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निर्यातीत ५५ टक्के घट झाली असून देशाचे १५१४ कोटींचा परकीय चलनाचा फटका बसला आहे.

२०१९ मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने केंद्र सरकारने २९ सप्टेंबर २०१९ रोजी कांद्यावरील निर्यातबंदी आणली होती. याचा फटका कांदा निर्यातीला बसला असून देशात आर्थिक वर्ष २०१८-१९ खरीप, लेट खरीप आणि रब्बी असे मिळून २२८. १९ लाख टन कांदा उत्पादन झाले होते त्यात यंदा १० टक्के वाढ झाली असून २०१९-२० खरीप, लेट खरीप आणि रब्बी २५१.४६ लाख टन कांदा उत्पादन झाले आहे.

मागील वर्षी कांदा भावाने नवनवीन उच्चांक गाठत हाहाकार उडविल्यानंतर केंद्र शासनाने कांदा दर स्थिर करण्यासाठी निर्यातबंदी व्यापार्‍यांच्या साठवणूकीवर मर्यादा असे अनेक उपाय करत बाजारभाव स्थिर करण्याचा प्रयत्न केला. तब्बल पाच महिने कांदा निर्यातबंदी राहिल्याने देशातून होणारी कांदा निर्यात ठप्प झाली होती. त्यानंतर संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचा मुबलक पुरवठा झाल्याने कांद्याचे भाव कोसळण्यास सुरुवात झाली.

अखेर केंद्राने कांदा भावातील घसरण थांबवण्यासाठी १५ मार्च २०२० पासून निर्यातबंदी उठविली. मात्र या सर्वांचा परिणाम देशातील कांदा निर्यातीला बसला आहे. यंदा कांद्याचे बंपर उत्पादन झाले आहे. मात्र देशात संचारबंदीमुळे हॉटेल व्यवसाय पूर्ण बंद असल्याने कांद्याचा मोठा खप कमी झाला आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. याकरिता केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करून निर्यातीला चालना देण्याची गरज आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post