रस्त्याची झाली 'चाळण’



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरातील सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविताना अनेकदा अपघाताच्या घटना घडत आहेत. पावसामुळे खड्ड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून या खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.

शहरातील माळीवाडा, रामचंद्र खुंट, दाळमंडई, सर्जेपूरा, दिल्लीगेट, चितळेरोड, लक्ष्मीकारंजा, सांगळेगल्ली रोड, नेप्तीनाका, नालेगाव, बेग पटांगण, आशा टॉकीज रोड, शनी चौक या भागातील रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचून खड्डे अधिक मोठे झाले आहेत. काही ठिकाणी पावसामुळे रस्ते खचून खड्डे झाले आहेत. सततच्या पावसामुळे शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांसह पादचार्‍यांना रस्त्यांवरुन प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.


दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा चालकांना खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच पाऊस पडल्यानंतर तर रस्त्यातून मार्ग काढणे मोठे जिकीरीचे आणि धोकादायक ठरत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताबरोबरच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. हॉटेल नटराज पासून सर्जेपुराकडे जाताना रामवाडी ते पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्यावर तर प्रचंड खड्डे पडले आहेत.

या रस्त्यावर चारी चोदल्याप्रमाणे मोठ-मोठे खड्डे झाले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजायला मार्ग नाही. पावसामुळे सदरचा रस्ता निसरडा झाल्यामुळे अनेक खड्डे चुकविताना दुचाकी वाहनचालक घसरुन पडत आहेत. रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे, मणक्याचे आजार उद्भवत आहेत. महापालिकेने शहरातील सर्वच रस्त्यांची पाहणी करुन ते दुरुस्त करण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post