रुग्णांची स्त्राव तपासणी वाढवामाय अहमदनगर वेब टीम
मालेगाव - मालेगाव करोना उद्रेकाने मोठ्या प्रमाणात नागरिकांचा बळी जाऊन रुग्णसंख्यादेखील चिंताजनक होती. अशा बिकट परिस्थितीत मनपा, पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी चांगले परिश्रम घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र बाधित रुग्ण दररोज आढळून येत आहेत. त्यामुळे पुन्हा उद्रेक वाढू नये यासाठी रुग्णांच्या स्त्राव तपासणीमध्ये वाढ केली पाहिजे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मालेगावी भेट देत मसगा महाविद्यालयातील करोना उपचार केंद्राची पाहणी करत बाधित रुग्णांशी संवाद साधला. यानंतर मनपा व आरोग्य यंत्रणेच्या अधिकार्‍यांची बैठक घेत त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. आयुक्त दीपक कासार यांनी सविस्तर अहवाल सादर केला.

यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी करोना उद्रेक नियंत्रणासाठी अत्यंत विपरीत परिस्थितीत झटणार्‍या मनपा, पोलीस यंत्रणेच्या परिश्रमाची प्रशंसा केली. जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनीदेखील रुग्ण तपासणीसाठी चांगली मदत केली. शहरात पुन्हा उद्रेक वाढू नये यासाठी मनपा प्रशासनाने उपाययोजनादेखील केली आहे. ‘मालेगाव पॅटर्न’ आपणाला माहीत नाही, मात्र शहरात बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे संशयित रुग्णांची स्त्राव तपासणी संख्या वाढवण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

करोना बळींची संख्या अधिक

उद्रेक काळात मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाला. स्त्राव तपासणी न झाल्याने त्यांची नॉन करोना मृत्यू अशी नोंद झाली आहे. गतवर्षाची मृतांची संख्या लक्षात घेतल्यास यंदा मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावरून करोना बळींची संख्या शासन दाखवत असलेल्या संख्येपेक्षा अनेक पटीने जास्त असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

यावेळी माजी पालकमंत्री आ. गिरीश महाजन, आ. जयकुमार रावल, खा.डॉ. सुभाष भामरे, खा.डॉ. भारती पवार, आ. राहुल आहेर, जिल्हा बँक चेअरमन केदा आहेर, जि. प. सदस्या मनीषा पवार, लकी गिल, जे. डी. हिरे, समाधान हिरे, जिल्हाध्यक्ष सुरेशनाना निकम, गटनेते सुनील गायकवाड, मदन गायकवाड, पोपटराव लोंढे, दीपक पवार, अरुण पाटील, नितीन पोफळे, देवा पाटील, संजय काळे, विजय देवरे, राजेंद्र शेलार, सुधीर जाधव आदी पदाधिकार्‍यांसह जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे,

मनपा आयुक्त दीपक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद गुंठे, डॉ. सपना ठाकरे, सहायक आयुक्त राहुल मर्ढेकर, अनिल पारखे, शहर अभियंता कैलास बच्छाव, सचिन माळवाळ आदी अधिकारी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post