पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या आरोग्याची काळजीमाय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - पावसाळा म्हटले, की पावसात भिजणे, गरमागरम वडापाव-भज्यावर ताव मारणे आणि मस्त एन्जॉय करणे या सगळ्या गोष्टींना उत येतो. मात्र याच पावसाळ्यात रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असते. आसपासचे दवाखाने हाऊसफुल होतात. कारण पावसाळ्यात पाण्यावाटे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत असते. हवामानात ओलसरपणा असल्याने सर्दी, ताप यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळते. या आजारांचे कारण कोणतेही असले तरीही स्वच्छता हाच खबरदारीचा उपाय आहे. हिवताप, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होतो. आपल्या आजूबाजूचा परिसरात पाणी साठून राहिल्यास डासांची पैदास होते. अशा ठिकाणी मच्छर प्रतिबंधक औषध फवारणी करून घेणे गरजेचे ठरते.


रस्त्यावरचे पदार्थ टाळा : पावसाळ्यातील थंडगार वातावरणामुळे तळलेले गरम गरम पदार्थ खाण्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही; परंतु हे पदार्थ बाहेर खाण्यापेक्षा घरच्या घरीच बनवून खाल्ले तर आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही योग्यच असते. बाहेरचे पाणी, तेल यांद्वारा जंतुसंसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. लहान मुलांना यांपासून दूरच ठेवावे.

आहार योग्य ठेवणे : पावसाळ्यात पचनशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे हलका पण योग्य आहार घेणे योग्य ठरते. आहारात मुगाची खिचडी, फळभाज्या, मका यांचा समावेश करावा. पावसाळ्यात पालेभाज्या घेताना त्या व्यवस्थित बघून घेणे. पावसाळ्यात अतिआंबट आहार टाळावा. त्यामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो. बाहेरील थंड हवामानाला अनुसरून शरीराचे तापमान ठेवण्यासाठी आलं, सुंठ, गवतीचहा, तुळस यांचा चहाच घ्यावा.

पाणी उकळून पिणे : आजार होण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे पाणी. पाण्यावाटे शरीरात मोठ्या प्रमाणावर जंतूंचा प्रवेश होऊ शकतो, त्यामुळे शक्‍यतो पिण्याचे पाणी उकळूनच प्यावे. पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात झाकून ठेवावे.

पावसाळ्यातील आहार : पावसाळ्यात दूषित अन्न ग्रहण केल्याने पोटात जंतुसंसर्ग होतो. पावसाळ्यात हलके अन्न ग्रहण करावे, डाळी, कडधान्ये, भाकरी, सूप यांचा आहारात समावेश कारावा. विविध भाज्यांचे सूप घेतल्याने प्रतिकारशक्तीही वाढते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post