...तर कायदेशीर कारवाई करणारमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरातील सर्वच पिण्याच्या पाण्याच्या नळांना गटारीसारखे गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे कोरोना सारख्या गंभीर संकटाच्या काळातही प्रशासनाचा गलथान कारभार सुरू असून साथीच्या आजारांचा त्यामुळे फैलाव होऊ शकतो. या गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी याबाबत तातडीने कार्यवाही करुन उपाययोजना कराव्यात अन्यथा कोरोनाच्या गंभीर काळात काविळ, विषमज्वर सारख्या साथी पसरविल्याबद्दल पाणीपुरवठा विभाग आणि महापालिका आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जागरुक नागरिक मंचाने दिला आहे.

यासंदर्भात मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे, कैलास दळवी, अभय गुंदेचा, भैरवनाथ खंडागळे, योगेश गणगले, सुनील कुलकर्णी, राजू पडोळे, नंदप्रकाश शिंदे, धनेश बोगावत, निर्मला भंडारी, किर्ती शहा आदी पदाधिकार्‍यांनी महापलिका आयुक्तांना नोटीस पाठवली आहे. त्यात म्हटले आहे की, मागील आठवड्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे अर्धे शहर पाण्यात डुंबत होते, कारण आपत्ती व्यवस्थापन नावाच्या कागदी गलथान कारभारामुळे कुठलीही उपाययोजना आजही केलेली दिसत नाही.

संपूर्ण गावठाण व अर्धे शहर कमरे एवढ्या पाण्यात डुंबत होते व त्यामुळे गटारीचे, ड्रेनेजचे पाणी सालाबादाप्रमाणे यावर्षीही पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनमध्ये घुसलेले आहे, आणि तेच पाणी सर्व नागरिकांना आज प्यावे लागत आहे, यासंदर्भात या पाण्याचे नमुने सरकारी प्रयोगशाळेत तपासायला दिलेले असून, प्रत्यक्ष दिसताना सदरचे पाणी गटारी सारखे गढूळ दिसत आहे, मागील वर्षी देखील अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवली होतीच तेव्हा जागरूक नागरिक मंचाने सरकारी प्रयोगशाळेतून सदर पाणी अजिबात पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल सादर केला होता, परंतु कातडी बचाव धोरणामुळे आपल्या अधिकार्‍यांकडून तो संशयास्पद असल्याचा हास्यास्पद खुलासा करून सारवासारव केली गेली होती व असे कारण दिले गेले होते की सरकारी प्रयोगशाळेत पाणी तपासण्यासाठी द्यायचे असेल तर रीतसर अर्ज करून मनपाच्या पाणी पुरवठा विभागातल्या एका अधिकार्‍याने दोन पंचांसमक्ष पाणी बाटली बंद, सीलबंद करून तपासायला द्यायला हवे होते, असे ब्रिटिशकालीन नियम आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे ते पाणी तपासायला आजही दिले आहे, कारण आपला पाणी पुरवठा अधिकारी हाच मुळात न्यायालयाच्या जामिनावर असल्यामुळे तो अधिकारी आम्हा सामान्य नागरिकाला दोन पंचांसमक्ष कधी उपलब्ध होईल याची खात्री नाही, तरीदेखील आपण सदरचे पाणी आपल्या सोयीस्कर पद्धतीने तपासून योग्य ती तातडीची उपाययोजना करावी दरम्यान आम्हीदेखील आजारी पडण्यापूर्वी प्रामाणिकपणे सदरचे गढूळ पाणी तपासायला दिले आहे, याची नोंद घ्यावी याबाबत काही वर्षापूर्वी आगरकर मळ्यामध्ये जी मोठी काविळीची साथ पसरली होती व अनेक बळी गेले होते तसेच बळी आजच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यानंतर आपले प्रशासन जागे झाल्यास त्याचा काही फायदा नाही.

तपासायला दिलेल्या पाण्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जर ते पाणी पिण्यास अयोग्य आहे, असा आला तर निष्काळजीपणा व कोरोनाच्या गंभीर काळातही काविळ, विषमज्वर सारखी साथ पसरविल्याबद्दल पाणी पुरवठा विभाग व आपणावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post