माय नगर वेब टीम
अहमदनगर - महापालिकेच्या कोंडवाडा विभागात कार्यरत असणारे हंगामी कर्मचारी आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांच्या शेतावर काम करत असल्याचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हंगामी कर्मचार्यानेच हे बिंग फोडल्याने आयुक्तांच्या कारवाईकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या कोंडवाडा विभागात 12 कर्मचारी हंगामी म्हणून कार्यरत आहेत. त्यातील बाबाजी शिंदे यांचा डेंग्युने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महापालिकेवर आज मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हंगामी 11 कर्मचारी सहभागी झाले होते. त्यातील एकाने बाईट देत डॉ. बोरगे यांच्यावर गंभीर आरोप केले. दोन वर्षापासून पगार नाही. डॉ. बोरगे यांच्या सोनेवाडी येथील शेतावर आलटून पालटून हंगामी कर्मचारी काम करण्यासाठी जात असल्याचा गौप्यस्फोट या व्हिडीओ क्लीपमध्ये करण्यात आला आहे.
उद्यानप्रमुखालाही मलिदा
महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख यु.जी. म्हसे यांना पगार काढण्यासाठी 14 हजार रुपये दिल्याचा गौप्यस्फोट या व्हिडीओत करण्यात आला आहे. या व्हिडीओमुळे डॉ. बोरगे यांच्यासोबतच म्हसे हेही अडचणीत सापडले आहेत. आता आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग काय कारवाई करतात याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.


Post a Comment