शहरात आणखी एक कंन्टेन्मेंट झोन वाढला



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- अहमदनगर महापालिका क्षेत्रातील सारडा कॉलेज मागील कवडे नगर परिसरातील कमलेश रो हाऊसिंग सोसायटी भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग होवून कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी कमलेश रो हाऊसिंग सोसायटी परिसर २१ जुलै पर्यंत कंन्टेन्मेंट झोन तर त्या भोवतालचा कवडेनगर वसाहत, सारडा कॉलेज परिसर सिद्धार्थ नगर परिसर,जाधव मळा, गायकवाड मळा, पारिजात कॉलनी हा परिसर बफर झोन जाहीर केला आहे.

शहरातील तोफखाना व सिद्धार्थनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने या क्षेत्रातून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दोन्ही भागात दि.२४ जून ते दि.७ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कंन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले होते. मात्र या कालावधीतही या दोन्ही परिसरात सातत्याने मोठ्या प्रमाणावर बाधित रुग्ण आढळत राहिल्याने या दोन्ही झोनच्या कंन्टेन्मेंट व बफर झोनच्या कालावधीत १४ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी घेतला आहे. त्यामुळे या झोनमध्ये सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री सेवा बंद राहणार आहेत तसेच या परिसरात नागरिकांच्या संचारावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच नालेगाव आणि आडते बाजार हे परिसरही या पूर्वीच कन्टेन्मेंट झोन जाहीर केलेले आहेत. त्यामुळे शहरात आता आणखी एका कन्टेन्मेंट झोनची भर पडली आहे.

कन्टेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बफरझोनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र इतर आस्थापना व दुकाने बंद राहणार आहेत.

कन्टेन्मेंट व बफर झोनसाठीचे आदेश
या ठिकाणी प्रशासनातर्फे कंट्रोल रुम्स स्थापन करुन ती २४ तास कार्यरत ठेवली जाणार आहे. त्यामध्ये ३ ते ४ अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करुन प्रत्येक शिफ्टमधील अधिकारी कर्मचार्‍यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. या झोनसाठी सनियंत्रण अधिकारी म्हणून महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या परिसरात प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी ठेवण्यात आलेल्या प्रवेशद्वारातून तातडीची वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक व वितरण व्यवस्थेशिवाय इतरांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसेच ये-जा करणार्‍या व्यक्तींची थर्मल स्कॅनरद्वारे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. कंन्ट्रोल रुममध्ये रजिस्टर ठेवून त्यात नोंदी घेण्यात येणार आहेत व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू स:शुल्क पुरविल्या जाणार आहेत. या क्षेत्रातील रहिवाश्यांना आवश्यक असणारे दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी बाबी शुल्क आकारुन महापालिका यंत्रणेमार्फत पुरविण्यात येणार आहेत. तसेच या क्षेत्रातील सर्व बँकांनी नागरिकांसाठी बँकींग सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या क्षेत्रातील सर्व पर्यायी रस्ते पोलिसांनी पत्रे तसेच बॅरिकेटस् लावून बंद केले जाणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कंन्टेन्मेंट व बफर झोन २१ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत राहणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post