तीन दिवसाच्या लेकीला संपवले!
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन स्वतः च्या तीन दिवसाच्या नवजात अर्भक मुलीस बापानेच दगडाने मारहाण करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मक्तापूर (ता. नेवासा) येथे घडला आहे. खून करणाऱ्या निर्दयी बापास पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे.
पतीने माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन तीन दिवसापूर्वी जन्मलेल्या मुलीच्या डोक्यात दगडाने मारहाण करून तिला जीवे मारले, अशी तक्रार संबंधित आरोपीच्या पत्नीने नेवासा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांनी नेवासा पोलीस ठाण्याला भेट देत तपासाच्या अनुंषगाने सूचना दिल्या. तसेच आरोपीच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली. ही पथके आरोपीचा शोध घेत असताना त्यांना संबंधित आरोपी हा मक्तापूर शिवारात गाढवननाला येथील ऊसाच्या शेतात लपून बसून असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र, पोलीस आल्याची माहिती मिळताच ऊसाच्या शेतात लपून बसलेल्या आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपीला मोठ्या शिताफीने पकडून ताब्यात घेतले आहे. आरोपीकडे चौकशी केली असता त्याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यांमध्ये सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याचे समोर आले.
पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.एस.डेरे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.डी.ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक पी.के.शेवाळे, बी.एच.दाते यांच्यासह पथकातील कर्मचारी राहुल यादव, सोमनाथ कुढारे, महेश कचे, नानासाहेब तुपे, संदीप गायकवाड, संभाजी गर्जे, अशोक कुदळे, गणेश गलधर, केवल रजपूत, रवी पवार, भागवत शिंदे, वसिम इनामदार, संदीप म्हस्के यांनी ही कारवाई केली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.