अहमदनगर – नगर शहरातील स्टेशन रस्त्यावरील बहुर्चित आणि बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला बुधवारी (दि.29) सकाळपासून सुरुवात झाली आहे. पुलासाठी जे पिलर उभारायचे आहेत. त्यासाठी भूगर्भातील माती व खडक परीक्षण करण्यासाठी सक्कर चौकापासून खोदाई सुरु करण्यात आली आहे. या पुलासाठी सक्कर चौक ते स्टेट बँक चौक या दरम्यान 90 पिलर (सिमेंट काँक्रीटचे मोठे खांब) उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी भूगर्भातील माती व खडकाचे परीक्षण केले जाणार आहे. त्यानंतर भूगर्भातील माती व खडकाच्या प्रकारानुसार पुलाचा आराखडा तयार करून प्रत्यक्ष काम सुरु केले जाणार असल्याचे ठेकेदार संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक गजानन शेळके यांनी सांगितले.
सदर उड्डाणपुलाच्या कामाचा ठेका हा बी.आर.अगरवाल कंपनीला देण्यात आलेला असून या कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक गजानन शेळके व सर्वेअर मॅनेजर दिपक पटेल यांच्या सह तांत्रिक कर्मचार्यांनी सक्कर चौकातून या कामास बुधवारी सकाळपासून सुरुवात केली आहे. दरम्यान दुपारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प अभियंता प्रफुल्ल दिवाण यांनी या कामाची पाहणी केली. व या कामाचा साधेपणाने औपचारिक शुभारंभ केला.
शहरातील उड्डाण पुलाचे काम गेल्या 10 वर्षांपासून रखडलेले आहे. या पुलाच्या कामाचे आत्तापर्यंत 2 वेळा भूमिपूजन करण्यात आलेले आहे. पण हे भूमिपूजन हा केवळ फार्स ठरला होता. खा.सुजय विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे खासदार होताच या कामासाठी पाठपुरावा केला. संसदेत प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटी घेवून पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानंतर या कामाला वेग आला.
अलीकडेच संरक्षण मंत्रालयाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. नगर शहरातील स्टेशन रस्त्यावरील बहुचर्चीत उड्डाणपुलाच्या कामाला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिलेली असून हे काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेवून दिली होती. अखेर सक्कर चौकात साधेपणाने या कामाची आजपासून सुरुवात झाली.
Post a Comment