स्थायी समिती निवड सदस्यांपदी यांची वर्णी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महापालिका स्थायी समितीच्या रिक्त असलेल्या आठ जागांवर सदस्यांच्या नियुक्त्या गुरुवारी (दि.30) दुपारी झालेल्या ऑनलाईन सभेत करण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजपाचे 2, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 तर काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या जागा गेल्या सहा म हिन्यांपासून रिक्त होत्या. राज्य शासनाच्या 3 जुलैच्या परिपत्रकानुसार या सदस्यांच्या निवडीसाठी गुरुवारी दुपारी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभा पार पडली.

यावेळी सभागृहात उपमहापौर मालनताई ढोणे, आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त प्रदीप पठारे, नगर सचिव एस. बी. तडवी, सभागृह नेते स्वप्निल शिंदे आदी उपस्थित होते. सभा सुरू होण्यापुर्वी महापौरांकडे राजकीय पक्षांच्या गटनेत्यांनी बंद पाकीटात आपल्या पक्षाच्या सदस्यांची नावे सादर केली. सभा सुरू झाल्यानंतर महापौर वाकळे यांनी गटनेत्यांकडून प्राप्त झालेल्या नावांची यादी जाहीर केली. त्यानुसार भाजपच्या गटनेत्या मालनताई ढोणे यांनी दिलेल्या पत्रानुसार भाजपच्या वतीने मनोज कोतकर व सोनाबाई शिंदे यांची नावे जाहीर करण्यात आली.

शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांच्या पत्रानुसार विजय पठारे व शाम नळकांडे यांची नावे घोषित करण्यात आली. काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव यांच्या पत्रानुसार सुप्रिया जाधव यांचे नाव जाहीर करण्यात आले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संपत बारस्कर यांच्या पत्रानुसार डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे व परविन कुरेशी यांची नावे जाहीर करण्यात आली. स्थायी समिती सदस्यांच्या रिक्त जागा भरल्यानंतर आता स्थायी समितीत शिवसेनेचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 5, भाजपाचे 3, काँग्रेसचे 2 व बहुजन समाज पक्षाचे 1 असे 16 सदस्य झाले आहेत. या निवडीनंतर आता स्थायी समिती सभापतीपदाची निवड होणार असून त्यासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post