धनगर आरक्षणाबाबत सर्वच सरकारांनी धोका दिलामाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - 'धनगर समाजाच्या आरक्षणाची चळवळ पेटली की, त्या चळवळीला कुठेतरी वेगळे वळण देऊन संपवायचे, अशा प्रकारचे सूत्र आजपर्यंत सर्व सरकारांनी ठेवले आहे. धनगर आरक्षणाबाबत सर्वच सरकारांनी आम्हाला धोका दिला आहे,' असा आरोप जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहू शेवाळे यांनी नगरमध्ये बोलताना केला.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव, पोखरी, कुरण, करुले या गावाच्या डोंगराळ भागात मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेलेल्या एका मेंढपाळ कुटुंबावर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा मागे घ्यावा, तसेच तळेगाव, पोखरी, पारेगाव खुर्द परिसरातील खुल्या क्षेत्रात मेंढीचराईस प्रतिबंध करण्यात येऊ नये, आणि वन कर्मचाऱ्यांकडून मेंढपाळांचा होणार छळ तात्काळ थांबविण्यात यावा, अशी मागणी करीत तसे निवेदन आज जय मल्हार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व उप वनसंरक्षक यांना देण्यात आले आहे. मागण्यांबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. निवेदन देण्यासाठी शेवाळे हे नगरमध्ये आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी धनगर आरक्षणावरून सरकारवर निशाणा साधला.

'धनगर समाजाच्या आरक्षणाची चळवळ पेटली की त्यामधील धनगर समाजातील नेत्यांना बगलेत घ्यायचे, आणि या चळवळीला कुठेतरी वेगळे वळण देऊन तिला दाबायचे, संपवून टाकायचे, अशा प्रकारचे सूत्र आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षाच्या सत्ता भोगणाऱ्यांचे राहिले आहे . आम्हाला सर्वच सरकारांनी आरक्षण बाबतीत धोका दिला आहे. पण राज्यातील धनगर समाज आज ना उद्या याबाबत जागृत होऊन निश्चितपणे आपले आरक्षण पदरात पाडून घेतल्या शिवाय राहणार नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post